नवी दिल्ली : News Network
हृदयरोग ही अलीकडच्या काळात मोठीच समस्या बनत चालली आहे. ब-याचदा दुर्लक्षामुळे हृदयरोगाचे निदान होण्यास वेळ लागतो. त्यामुळे उपचारदेखील उशीरा सुरू होतात. पण, समजा हृदयरोगाचे निदान काही सेकंदात करता आले तर? आश्चर्य वाटेल पण, आता हे शक्य आहे.

अमेरिकेतील भारतीय वंशाच्या १४ वर्षीय मुलाने एक एआय अॅप विकसित केले आहे. या अॅपद्वारे हृदयरोग आहे की नाही ते केवळ ७ सेकंदात कळू शकते. त्यामुळे या जिनियस मुलाचे कौतूक होत आहे. खुद्द माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि ज्यो बायडेन, चंद्राबाबू नायडू यांनीही त्याचे कौतूक केले आहे.
सिद्धार्थ नंद्याला असे या मुलाचे नाव. तो अमेरिकेतील असला तरी त्याचे मूळ भारतीय आहे. त्याने ‘सर्केडियन एआय’ हे अॅप विकसित केले आहे. ते हॉस्पिटलमध्ये वापरासाठी आहे. हृदयरोगाचे निदान काही सेकंदात करण्यास या अॅपमुळे मदत होते. भारत आणि अमेरिकेतील हजारो रुग्णांवर या ‘सर्केडियन एआय’ अॅपची चाचणी घेण्यात आली आहे. १४ वर्षीय सिद्धार्थ डल्लास येथे राहतो. त्याच्या या नवीन शोधाने तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात धुमाकूळ घातला आहे.
अॅप असे काम करते : सर्केडियन अॅपमध्ये हृदयाच्या ध्वनी रेकॉर्डिंगचे विश्लेषण केले जाते. त्याद्वारे आरोग्याचे तपशील देता येतात. एक प्रकारे तुमचे हृदय तुमच्याशी बोलू लागले तर… असाच हा प्रकार आहे. हे एआय सहाय्यक साधन आहे. हेच तुम्हाला हृदयाच्या आरोग्याद्दल माहिती देते. हे अॅप हृदयाजवळ धरून ७ सेकंद रेकॉर्ड करायचे. त्यानंतर एक निदान येते. हे अॅप हृदयरोगाचे ४० प्रकार ओळखू शकते.
सात महिने संशोधन : सिद्धार्थने एका मीडिया मुलाखतीत सांगितले की, जगभरात ३१ टक्के मृत्यू हृदयरोगामुळे होत आहेत. हे इतके उच्च प्रमाण पाहूनच या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली. जीवन वाचवू शकेल, असे काहीतरी मला करायचे होते. या विकास प्रक्रियेत डेटा गोळा करणे, मॉडेल प्रशिक्षण आणि हॉस्पिटल चाचणी समाविष्ट होती, ज्यासाठी सुमारे सात महिने लागले.सध्या हे अॅप वैयक्तिक वापरासाठी उपलब्ध नाही, तर हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल स्क्रीनिंगसाठी आहे.