मुंबई : प्रतिनिधी


घरगुती हिंसाचाराच्या आरोप प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना पोटगी द्यावी, असे आदेश दिले आहेत. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा या आपल्या पत्नी नसल्याचे आणि आम्ही लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये होतो असा दावा केला होता. करुणा शर्मांसोबतचे संबंध हे विवाहाच्या स्वरूपाचे असल्याचे दिसून येते आणि घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत त्या दिलासा मिळण्यास पात्र असल्याचे कोर्टाने म्हटले.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी शनिवारी दिलेल्या आदेशात, धनंजय मुंडे यांचे अपील फेटाळून लावले होते, ज्यामध्ये त्यांनी करुणा शर्मांना देखभाल खर्च देण्याच्या दंडाधिका-यांच्या आदेशाला आव्हान दिले होते. धनंजय मुंडेंनी अपीलात दावा केला होता की त्यांचे कधीही करुणा शर्मा यांच्याशी लग्न झाले नव्हते. यावर त्या कायदेशीररित्या विवाहित पत्नी आहे की नाही हे योग्य मंचाने ठरवावे, असे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाचा सविस्तर आदेश समोर आला आहे.
करुणा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध लग्नासारखे आहेत कारण त्यांनी दोन मुलांना जन्म दिला आहे आणि एकाच घरात राहिल्याशिवाय ते शक्य नाही, असे कोर्टाने म्हटले.