पुणे : विशेष प्रतिनिधी
सन २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांना अत्याधुनिक अशी ‘उच्च सुरक्षा पाटी’ (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट) ३० मार्चपूर्वी बसवणे अनिवार्य करण्यात आले होते. त्याला आता ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारकडून तीन कंपन्यांना टेंडर देण्यात आले आहे. त्यानुसार पुणे प्रादेशिक परिवहन विभागात उच्च सुरक्षा पाटी बसवण्याचे काम सुरू असून, त्याला वाहनधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय याला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन आयुक्तांकडून देण्यात आली.

देशातील सर्व वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट देणे बंधनकारक केले आहे. तेव्हापासून नव्याने वाहन खरेदी केल्यानंतर या नंबरप्लेट उपलब्ध होतात. हाय सिक्युरिटी नंबरप्लेट वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तयार करण्यात आली आहे. एप्रिल २०१९ नंतर बाजारात येणा-या सर्व वाहनांना ती अनिवार्य आहे. तसेच २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांनादेखील परिवहन विभागाने उच्च सुरक्षा पाटी (एचएसआरपी) बंधनकारक केली आहे. त्यानुसार ३० एप्रिलपर्यंत हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लावून घ्यावी लागणार आहे.