मुंबई : khabarbat News Network
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून शेअर बाजारात सुरू झालेली घसरण थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. ४ महिन्यात निफ्टी १३% आणि सेन्सेक्स १२% नी घसरला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये तर मोठी घसरण झाली. मिडकॅप शेअर्स १६% आणि स्मॉलकॅप शेअर्स २०% ने घसरले आहेत. निफ्टी ५०० इंडेक्स देखील १५% ने घसरला आहे. बाजाराची ही कमजोरी गुंतवणूकदारांसाठी मोठी धक्कादायक ठरत आहे. गुरुवारी (२० फेब्रुवारी) शेअर बाजारात दिवसभर लाल रंगात व्यवहार केल्यानंतर निफ्टी १९ अंकांनी तर सेन्सेक्स २०३ अंकांनी घसरला.

गुंतवणूकदारांची गळती : बाजार घसरण्यामागे सर्वात मोठे कारण परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री आहे. २६ सप्टेंबर २०२४ पासून, ‘एफआयआय’ने आतापर्यंत ३ लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. तर २०२५ च्या सुरुवातीपासून, सुमारे १.०६ लाख कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत.
निफ्टीच्या साप्ताहिक मुदतीनंतर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरला होता. निफ्टीही ७० अंकांनी घसरला. बँक निफ्टीमध्ये १५० अंकांची कमजोरी होती. ओपनिंगसह, निफ्टीवर आयटीसी, मारुती, एअरटेल सारख्या मोठ्या समभागांमध्ये घसरण दिसून आली. एचडीएफसी बँकेतील कमजोरीमुळे बँक निफ्टीवर दबाव होता. ऑटो आणि एफएमसीजी निर्देशांकात सर्वात मोठी घसरण झाली. मेटल इंडेक्समध्ये वाढ झाली. त्याच वेळी, श्रीराम फायनान्स, हिंदाल्को, सिप्ला, इन्फोसिस यांनी निफ्टीमध्ये वाढ नोंदवली.