कोल्हापूर : प्रतिनिधी
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूळ मंदिरासमोरील गरुड मंडप उतरवल्याने त्यानंतरचे दोन्ही किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाले आहेत. त्यामुळे नव्याने बांधकाम होण्यापूर्वी मंडपाच्या कमानीची रुंदी वाढवणे गरजेचे असल्याचे मत अभ्यासकांनी मांडले आहे. तब्बल २०० वर्षांनंतर गरुड मंडप उतरवला आहे. आता संधी आहे तर कमानीची रचना थोडी बदलली की, किरणोत्सवातील हा अडथळा कायमचा दूर होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने याचा विचार करावा, अशी मागणी होत आहे.

नोव्हेंबरमध्ये आणि आत्ता देखील प्रखर सूर्यकिरणे देवीच्या मुकुटाच्या वरपर्यंत गेली आहेत. हा गरुड मंडप उतरविल्याचा परिणाम आहे. आता गरुड मंडपाचे नव्याने बांधकाम होणार आहे. कमानीची रचना बदलण्याची हीच संधी आहे.
किरणोत्सवात दोन दिवसांचा फरक
अंबाबाईच्या किरणोत्सवांच्या तारखांमध्ये काळानुरूप थोडा बदल झाला आहे. दक्षिणायन म्हणजेच नोव्हेंबरमधील किरणोत्सवाच्या तारखा दोन दिवसांनी पुढे गेल्या आहेत. म्हणजेच हा सोहळा ९ ते १३ नोव्हेंबरदरम्यान होत आहे; तर उत्तरायण किरणोत्सव दोन दिवस आधी म्हणजे २९ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान होत आहे.