वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
जगभरातील काही अब्जाधीशांचा बाजार उठवायला निघालेल्या अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्गने स्वत:चाच गाशा गुंडाळला आहे. २०१७ ते २०२४ या कालावधीत या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अहवालांनी खळबळ उडवून दिली होती. या काळात गौतम अदानी, जॅक डोर्सी आणि कार्ल इकान यांसारख्या जगातील आघाडीच्या अब्जाधीश उद्योगपतींचे सर्वाधिक नुकसान झाले.

जानेवारी २०२३ मध्ये अदानी समुहाच्या विरोधात प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टने शेअर बाजारात गोंधळ उडाला होता. पण, हिंडनबर्गने जॅक डोर्सी आणि कार्ल इकान यांचेही नुकसान केले.
कार्ल इकान कोण आहेत : कार्ल इकान हे अमेरिकन शेअर बाजारातील एक मोठे प्रस्थ आहे. कार्ल यांची इकान इंटरप्राइजेज नावाची कंपनी आहे. ज्यामध्ये फंडाच्या माध्यमातून गुंतवणूकही केली जाते. कार्ल हे जगाने पाहिलेल्या सर्वात यशस्वी हेज फंड व्यवस्थापकांपैकी एक असून वॉल स्ट्रीटवरील महान गुंतवणूकदारांपैकी एक मानले जातात. इकानने त्यांच्या गुंतवणूक आणि कॉर्पोरेट व्यवहारांद्वारे अफाट संपत्ती कमावली. त्यांची एकूण संपत्ती ८.१ ते २४ अब्ज डॉलर्सदरम्यान असण्याचा अंदाज आहे.
जॅक डोर्सीही बळी : अदानी समूहानंतर शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सीला आपला बळी बनवले. मार्च २०२३ मध्ये, जॅक डोर्सीच्या फर्म, ब्लॉकच्या शेअर्समध्ये २० टक्के घट झाली. हिंडेनबर्गने आपल्या अहवालात आरोप केला आहे की ब्लॉक इंक आपल्या युजर्स आणि सरकारची फसवणूक करत आहे. यामध्ये डोर्सी यांच्यावर चुकीची आकडेवारी जाहीर करून गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोपही करण्यात आला होता. ब्लॉक इंकची अर्ध्याहून अधिक खाती बनावट आहेत. परंतु, कंपनीने युजर्सची संख्या फुगवली असल्याचा दावा केला होता.
अशा फसवणुकीतून जॅक डोर्सीने ५ अब्ज डॉलर्सचे व्यावसायिक साम्राज्य उभारले असल्याचा आरोप हिंडनबर्ग यांनी केला होता. या अहवालानंतर, ब्लॉक इंकच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाली, कंपनीचे मार्केट कॅप एका दिवसात ६.५ अब्ज डॉलर्सने (५,६२,१२,८७,७५,००० रुपये) कमी झाले.
अदानीच्या ९ शेअर्समध्ये ९ टक्के वाढ
अमेरिकेतील हिंडेनबर्ग ही रिसर्च फर्म आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअरने जोरदार उसळी घेतली. अदानी यांच्या नऊ शेअरमध्ये वाढ झाली. किमतीमध्ये सुमारे नऊ टक्के वाढ झाली. सेन्सेक्समध्ये ३१८.७४ वाढ झाली. २०२३ मध्ये हिंडेनबर्ग या संस्थेने अदानी यांच्या कंपन्यांचा नकारात्मक अहवाल दिल्यानंतर त्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती. सुमारे १०० अब्ज डॉलरचे नुकसान झाले होते.