नवी दिल्ली : khabarbat News Network
बहुतेक देशात सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये ८ किंवा ९ तास काम करण्याची संस्कृती आहे. मात्र इन्फोसिसचे सह-संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांनी तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम केले तर जगाच्या अर्थव्यवस्थेसोबत स्पर्धा करू शकू असे म्हटले होते. मात्र आता कामाच्या तासांबद्दल बोलताना लार्सन अँड टुब्रो या कंपनीचे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यन यांनी नारायण मूर्ती यांच्या पेक्षाही एक पाऊल पुढे टाकले आहे. कर्मचा-यांनी आठवड्यातून ९० तास काम करावे असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Read More | बुलेट ट्रेनच्या मार्गातील ५ मजली बसस्थानक सरकविण्यात यश!
नारायण मूर्ती यांनी आठवड्यातून ७० तास काम करण्याबाबत केलेल्या विधानानंतर, सोशल मीडियावर एस. एन. सुब्रमण्यन यांनी केलेल्या वक्तव्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. एल अँड टीच्या सहा दिवसांच्या कामाच्या आठवड्याच्या धोरणाबद्दल कर्मचा-यांशी झालेल्या संवादादरम्यान त्यांनी भाष्य केलं. कर्मचा-यांशी बोलताना सुब्रमण्यम यांना अब्जावधी डॉलरची कंपनी आपल्या कर्मचा-यांना शनिवारीही का कामावर बोलावते असं विचारण्यात आलं होतं. त्यावर सुब्रमण्यम यांनी दिलेल्या उत्तराची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
पत्नीकडे किती वेळ पाहू शकता?
कर्मचा-यांनी सुट्टीच्या दिवशी घरी थांबण्याची कल्पना त्यांनी फेटाळून लावली आणि म्हटलं की, तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहू शकता? तुमची पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहू शकते? ऑफिसला जा आणि कामाला लागा. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी कर्मचा-यांनी ऑफिसमध्ये येऊन काम करा असा सल्ला एस. एन. सुब्रमण्यम यांनी दिला.