बंगळुरू : khabarbat News Network
‘केजीएफ’ सिनेमांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली कोलार गोल्ड फील्ड्स पुन्हा सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘केजीएफ’च्या कामगार संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून पुन्हा ‘केजीएफ’ चालू करण्याची मागणी केली आहे. यामुळे भारत शक्तीशाली देश बनेल तसेच दोन लाख लोकांना रोजगार मिळेल असेही सांगण्यात आले आहे. ज्या कोलारच्या खाणीत कधी काळी सोन्याची नदी वाहत होती ती २००१ मध्ये बंद केलेली ‘केजीएफ’ पुन्हा सुरु झाली तर भारतात सुवर्णयुग सुरु होईल, असा दावा या संघटनेने केला आहे.

कोलार जिल्ह्यातील या गावाने इंग्रजांच्या काळात सुवर्णयुग पाहिलेले आहे. बंगळूरुपासून १०० किमीवर असलेला हा गाव आज मरणासन्न यातना भोगत आहे. ब्रिटिशांनी १८८० ला ही खाण सुरु केली होती. २००१ ला भारत सरकारने कमी सोने मिळत असल्याच्या कारणामुळे ती बंद केली होती.
या १२१ वर्षांच्या काळात केजीएफमधून ९०० टन सोने काढण्यात आले आहे. अजून ३० लाख टन सोने या केजीएफमध्ये दडलेले आहे. परंतू ते काढण्याचा खर्च एवढा होता जो भारत सरकारला तेव्हा परवडणारा नव्हता, यामुळे ती कंपनी बंद करण्यात आली होती.
१९९४, १९९७ आणि २००० मध्ये कोलार गोल्ड फील्डमधील सोन्याच्या साठ्याचा शोध घेण्यासाठी ३ संसदीय स्थायी समित्या स्थापन करण्यात आल्या. या समित्यांनी २०१० मध्ये त्यांच्या अहवालात ‘केजीएफ’मध्ये अजूनही ३० लाख टन सोन्याचा साठा असल्याचे सांगितले होते. दक्षिण आफ्रिका दरवर्षी २०० टनांपेक्षा जास्त सोने काढते; तर भारतात वर्षभरात फक्त १ टन (१ हजार किलो) सोन्याचे उत्पादन होते, असे त्यांनी म्हटले आहे. १८८० ते १९५६ पर्यंत, इंग्लंडच्या जॉन टेलर आणि सन्स कंपनीने ‘केजीएफ’मधून दरवर्षी सुमारे १० टन सोने काढले. २००१ पर्यंत, ३.५ किमी खोलीतून एकूण ९०० टनांहून अधिक सोने काढण्यात आले. आता मायनिंग सुरु केले तर भारत १०० टन सोने काढू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.