चिपळूण : प्रतिनिधी
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. शरद पवार हे चिपळूण दौ-यावर गेले असता तेथून परत येत असताना ही घटना घडलीे. हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता.


चिपळूण येथे आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम झाल्यानंतर शरद पवार परतीच्या प्रवासाला निघाले असता हेलिकॉप्टरमध्ये हा तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर १० फुटांवर तब्बल १० ते १५ मिनिटे अडकून पडले होते. उड्डाण घेण्यासाठी शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरला सलग तीन वेळा प्रयत्न करावे लागले. अखेर तिस-या प्रयत्नामध्ये या हेलिकॉप्टरने उड्डाण केले.
शरद पवार हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर प्रशासकीय अधिका-यांची धावपळ संपली होती. मात्र हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रशासकीय अधिका-यांची चांगलीच तारांबळ उडाली. काही वेळाने हेलिकॉप्टरने यशस्वी उड्डाण केले. त्यामुळे अधिका-यांनी नि:श्वास सोडला. यापूर्वी सुनील तटकरे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये देखील बिघाड झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली.