नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी

नव्या वर्षात पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागणार आहे. देशातील आघाडीच्या FMCG कंपन्या हिंदुस्तान युनिलिव्हर, गोदरेज कंझ्युमर, डाबर, टाटा कंझ्युमर, पार्ले प्रॉडक्ट्स, विप्रो कंझ्युमर, मॅरिको, नेस्ले आणि अदानी विल्मर या उत्पादन खर्चाची भरपाई आणि (Custom Duty) कस्टम ड्यूटीमुळे वस्तूंच्या किमती वाढवणार आहेत.
FMCG कंपन्यांच्या या निर्णयामुळे नवीन वर्षात चहा पावडर, तेल, साबणपासून क्रीमपर्यंतच्या किमतीत ५-२० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्यात खाद्यतेलाच्या (Idible Oil)आयातीवरील शुल्कात २२ टक्के वाढ झाली असून संपूर्ण वर्षभरात ४० टक्के वाढ झाली आहे.
यासंदर्भात पार्लेचे उपाध्यक्ष मयंक शाह यांनी सांगितले की, आम्ही आमच्या कंपनीच्या उत्पादनांच्या किमती वाढवणार आहोत. एक वर्षानंतर भाव वाढवले जाणार आहेत. याचा उत्पादनांच्या मागणीवर परिणाम होणार नाही, अशी आम्हाला आशा आहे.
रिटेल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म (BIZOM) बिझोमच्या ताज्या आकडेवारीनुसार, ग्रामीण भागांमध्ये वाढत्या मागणीमुळे ऑक्टोबरमध्ये देशातील एफएमसीजी उद्योगात वर्षाला ४.३ टक्क्यांची वाढ झाली. नोव्हेंबरमध्ये विक्री कमी झाल्यामुळे ४.८ टक्क्यांची घसरण झाली. शहरी आणि ग्रामीण भागात वर्षभरापूर्वीच्या तुलनेत वस्तूंच्या विक्रीत घट झाली आहे. दरम्यान, हिंदुस्थान युनिलिव्हरनेही (Uniliver) साबण आणि चहाच्या किमती वाढवल्या आहेत. डाबरने (Health Care) हेल्थकेअर आणि ओरल केअर (Oral Care)उत्पादनांच्या किमतीही वाढवल्या आहेत, तर नेस्लेने कॉफीच्या किमतीत वाढ केली आहे.
सर्वाधिक वापरल्या जाणा-या वस्तूंच्या किमती वाढल्याचा लोकांना फारसा फटका बसू नये. यासाठी कंपनीने काही निवडक श्रेणींमध्ये किमती वाढवल्या आहेत, असे टूथपेस्ट आणि मध बनवणारी कंपनी (Dabar) डाबरचे मुख्य आर्थिक अधिकारी अंकुश जैन यांनी सांगितले.