Khabarbat News Network

मुंबई : नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या बिग बजेट चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे. अभिनेता रणबीर कपूर यामध्ये प्रभू श्री राम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘रामायण’मध्ये सीतेची भूमिका साकारण्यासाठी साई पल्लवीने मांसाहार सोडून पूर्णपणे शाकाहार अवलंबल्याच्या चर्चांना उधाण आलंय. याच संदर्भातील वृत्त वाचून तिचा पारा चढला आहे. साईने संबंधित वृत्त शेअर करत त्यावर रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नव्हे तर तिने थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. एका तमिळ पब्लिकेशनने साई पल्लवीच्या शाकाहारबाबतचं वृत्त दिलं होतं.
हे पण वाचा : १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी
X अकाऊंटवर साईने लिहिलं, ‘बहुतेक वेळा, जवळजवळ प्रत्येक वेळी जेव्हा मी निराधार वृत्त/ अफवा/ बनावट, खोटी किंवा चुकीची विधानं कोणत्याही हेतूने किंवा हेतुशिवाय (देव जाणो) पसरवल्याचं पाहते तेव्हा मी गप्पच राहणं पसंत करते. पण आता पुरे झालं. कारण हे सतत घडतंय आणि थांबण्याचं नाव घेत नाहीये. विशेषत: माझ्या चित्रपटांच्या रिलीज/घोषणा किंवा माझ्या करिअरमधील आनंददायी क्षणांच्या वेळीच हे घडतं. पुढच्या वेळी जर मला प्रतिष्ठित पेज किंवा मीडिया किंवा एखादी व्यक्ती गॉसिपच्या नावाखाली काहीही कथा पसरवताना दिसलं, तर थेट कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. असा इशारा तिने दिला आहे.
विशेष म्हणजे साई पल्लवी ही आधीपासूनच शाकाहारी आहे. एका मुलाखतीत ती याबद्दल व्यक्त झाली होती. “जर तुम्ही जेवणाबद्दल बोलत असाल तर मी कायम शाकाहारीच राहिले आहे, असं ती म्हणाली होती.