नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी
राज्यसभेत शुक्रवारी जोरदार महाभारत घडले. एकीकडे दक्षिणेतील सुपरस्टार अल्लू अर्जुन याच्या अटकेची बातमी येऊन थडकली. तर दुसरीकडे राज्यसभेत त्याच्या ‘पुष्पा-२’ चित्रपटातील ‘मैं झुकेगा नही’च्या डॉयलॉगचा ट्रेलर उभ्या देशाने पाहीला. भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात इंडिया आघाडीने अविश्वास ठरावाची नोटीस दिली आहे. त्या प्रस्तावानंतर आज राज्यसभेत मोठा गोंधळ उडाला.

राज्यसभेत शुक्रवारी सभापती जगदीप धनखड आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद इतका वाढला की, अखेर राज्यसभेचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करावे लागले. खर्गे यांनी यावेळी धनखड यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला. दरम्यान आज राज्यसभेत शेतकरी आणि शेतमजूर या शब्दांचा डंका दिसून आला. तुम्ही मला कितीही झुकवण्याचा प्रयत्न केला तरी मी झुकणार नाही. मी शेतक-याचा मुलगा असल्याचे धनखड म्हणाले. तर त्याला लगेचच मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रत्युत्तर दिले. मी शेतमजूराचा मुलगा असल्याचा पलटवार खर्गे यांनी केला. तुम्ही पण मला दाबू शकत नाही. माझ्यावर दबाव टाकू शकत नाही, असा शाब्दिक वार खर्गे यांनी धनखड यांच्यावर केला.
विरोधी पक्षनेते आणि सभापती यांच्यातील ही बाचाबाची चांगलीच गाजली. जवळपास ५ मिनिटे दोन्ही ज्येष्ठांनी एकमेकांवर तुफान हल्लाबोल केला. या वादाची सुरुवात अविश्वास प्रस्तावावरून झाली. सभापती यांनी आपल्याविरोधात जो अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला. तो १४ दिवसानंतर सभागृहासमोर मांडण्यात येईल असे सांगितले.