khabarbat News Network

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे सातत्याने प्रगती करत आहे. देशात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहे. तर बुलेट ट्रेन लवकरच धाव घेईल. यासोबतच हायपरलूप ट्रेन सुद्धा या मालिकेत जोडल्या जाणार आहे. त्यासाठीचा ४१० किमीचा ट्रॅक पण तयार झाला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायपरलूप ट्रॅकचा व्हिडिओ शेअर केला आहे. रेल्वेची टीम आणि आयआयटी मद्रास या दोघांनी हा ट्रॅक तयार केला आहे.
हायपरलूप ट्रेन ही एक हायस्पीड ट्रेन आहे. ती एका ट्यूब व्हॅक्यूमधून धावेल. यामध्ये चुंबकीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ट्यूबमध्ये ही ट्रेन ताशी ११०० ते १२०० किमी वेगाने धावणार आहे. भारतीय रेल्वे जी हायपरलूप ट्रेन विकसीत करत आहे, तिचा जास्तीत जास्त वेग ६०० किमी इतका आहे. यामुळे विजेचा वापर, प्रदूषण पण कमी होईल. ही रेल्वे बुलेट ट्रेनला पण मागे टाकेल. हायपरलूप ट्रेनचे डिझाईन असे असते की एका तासात दिल्लीत ते पाटणा हे अंतर कापेल.
देशातील पहिली हायपरलूप ट्रेन ही मुंबई ते पुणे या दरम्यान धावणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई ते पुणे हे अंतर केवळ २५ मिनिटात कापता येईल. सध्या रेल्वेने या दोन शहरातील अंतर कापण्यासाठी ३ ते ४ तास लागतात.
विमानाइतके भाडे असणार
हायपरलूप ट्रेनमध्ये कुठे थांबा असण्याची शक्यता नाही. दोन शहरात थेट जावे लागेल. अर्थात या ट्रेनचे तिकीट हे विमान प्रवासाइतकेच असण्याची शक्यता आहे. एका पॉडमध्ये जवळपास २४-२८ प्रवासी बसू शकतील.