मुंबई : विशेष प्रतिनिधी
भाजपला पाठिंबा देण्याचा काही प्रश्नच नव्हता. आम्हाला शिवसेनेला भाजपपासून वेगळं करायचं होतं म्हणून राजकीय चाचपणी केली होती, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. २०१४ साली भाजपला पाठिंबा देण्याच्या विषयावरून शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी या प्रकरणाची कबुली दिली.

२०१४ साली भाजपने न मागता राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून पाठिंबा देण्यात आला होता, त्यामागे काय हेतू होता याविषयावर बोलताना शरद पवार म्हणाले की, विनाकारण नाही, तर २०१४ साली भाजपला आम्हाला पाठिंबा द्यायचा नव्हताच. आम्हाला केवळ शिवसेना आणि भाजप यांची जी युती होती, त्यांना वेगळे कसं करता येईल, आणि असे करू शकतो का? हे आम्हाला पाहायचे होते. त्यासाठी चाचपणी म्हणून आम्ही राजकीय विधान केले आम्ही त्यांना मदत कधी केली नाही. केवळ विधान केले होते. मात्र त्या विधानानंतर जसे आम्हाला हवे होते तेच घडत गेले. भाजप सत्तेपासून दूर गेली आणि शिवसेना आमच्यासोबत आली, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
षडयंत्र करून शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना भाजपपासून दूर केले हे आता स्वत: शरद पवार कबुल करत आहेत. २०१९ ला भाजप-राष्ट्रवादीची बैठक झाली ते त्यांनी अमान्य केले होते. मी २०२० पासून या बैठकीबाबत सांगत आहे. मी स्पष्ट सांगितले, गौतम अदानी त्या बैठकीत नव्हते, ही बैठक दिल्लीत झाली होती असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
अखेर २०१४ साली नेमकं काय घडलं…
२०१४ साली भाजप-शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सगळे प्रमुख पक्ष वेगवेगळे निवडणूक लढले होते. त्यात भाजप सर्वात मोठा पक्ष बनला. त्यानंतर निकालाच्या दिवशीच शरद पवारांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना येऊन आम्ही भाजपला सरकार बनवण्यासाठी बाहेरून पाठिंबा देऊ असे विधान केले. त्यानंतर विधानसभेत भाजपने बहुमत सिद्ध केले. तेव्हा शिवसेना विरोधी बाकांवर बसली होती. विरोधी पक्षनेते म्हणून एकनाथ शिंदे काम करत होते. मात्र काही महिन्यातच विरोधी बाकांवरील शिवसेना भाजपसोबत सत्तेत आली. त्यानंतर २०१९ पर्यंत शिवसेना-भाजपने सरकार चालवले. परंतु २०१९ च्या निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना भाजपत बिनसले आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली.