मालेगावात दोघांना अटक, ‘ईडी’चे २३ ठिकाणी छापे
मुंबई : khabarbat News Network
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना ‘ईडी’कडून छापेमारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एकूण २३ ठिकाणी छापे मारण्यात आले. व्होट जिहाद प्रकरणाशी या छापेमारीचा संबंध असल्याचे म्हटले जात असून पोलीस दल अॅक्शन मोडवर आले आहे. नॅशनल मर्कंटाइल बँकेशी संबंधित प्रकरणात ही छापेमारी आहे. १२५ कोटीच्या कथित बेकायदेशीर हस्तांतरणाचे हे प्रकरण आहे. नाशिकमधून अटक केलेल्या सिराज अहमदशी संबंधित ही छापेमारी आहे. व्होट जिहादसाठी १२५ कोटीहून अधिक पैशांचा वापर झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
१२५ कोटींच्या घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी ‘ईडी’ची टीम मालेगावात दाखल झाली. प्रमुख आरोपी असलेल्या सिराज अहमदच्या घरी ‘ईडी’कडून तपासणी सुरू आहे. नामको बँकेची देखील ‘ईडी’ चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यानंतर छावणी पोलीस स्टेशन मालेगाव येथे दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात चर्चा करणार आहे. दरम्यान, बुधवारी किरीट सोमय्या यांनी येत्या दोन दिवसांत धमाका होणार असे वक्तव्य केले होते.
या प्रकरणातील मास्टरमाईंड सिराज मोहम्मद याला आणि नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपक निकम यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव येथील बँकेत बेहिशोबी पैसा हवालामार्फत जमा झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी १२५ कोटी रुपये विविध बँक खात्यात जमा झाल्याचे आणि तो पैसा विविध खात्यात हस्तांतरीत केल्याचा आणि रोख रक्कम वाटल्याचा आरोप केला होता. हा पैसा वोट जिहाद असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तर यापूर्वी मालेगावमध्ये २५० कोटी रुपयांची बेहिशोबी रक्कम आल्याचे समोर आले होते. हवाला रॅकेटद्वारे ही रक्कम येत असल्याचे समोर आले होते.
एकाच महिन्यात २५०० व्यवहार
एका महिन्यात देशभरातील २०० बँक खात्यातून २५०० व्यवहार झाले. त्यातून रक्कमेची मोठी उलाढाल करण्यात आली. मालेगाव येथील सिराज अहमद आणि मोईन खान यांनी गरीब लोकांच्या नावाने बँक खाती उघडली. त्यात चार दिवसांत १२५ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यातील ३७ खात्यातील जमा रक्कम रोखीत बदलण्यात आली. ही रक्कम लागलीच काढण्यात आली. याप्रकरणात मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यात ७ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही रक्कम परदेशातून आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.