मुंबई : khabarbat News Network
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याविषयी अनेकदा मराठी माणसांनी दोघांना अनेकदा साद घातली. आता दस्तूरखुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्दावर त्यांचे मौन सोडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील राजकीय समिकरणांना जबरदस्त ‘तडका’ बसला आहे. अगोदर भाजपसोबत जाण्याचा सूर आळवल्यानंतर राज ठाकरे यांनी ‘दुश्मन एकत्र येतात, तर आम्ही का नाही?’ हे स्फोटक विधान केलं आहे.
राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले, उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नयेत, यासाठी अनेक लोक प्रयत्न करीत आहेत. यामध्ये काही आतले आणि काही बाहेरचे लोक आहेत. हे सगळेच जण प्रयत्न करत आहेत. माझ्याकडून मी अलर्ट असतो. कोण काय बोलतो हे मला कळतं, पण मी त्याकडे दुर्लक्ष करतो, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांनी कुणाचे नाव घेतले नसले तरी त्यांनी ही कोण मंडळी आहे, याकडे इशारा जरूर केला आहे.
जगातील दुश्मन एकत्र येतात. वर्षानुवर्षाचे दुश्मन वाद मिटवून एकत्र येत असतील, तर आम्ही दोघांनी एकत्र येण्यावर चर्चा तर हवी, असे राज ठाकरे म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांच्या वक्तव्याने आता उद्धव सेना आणि मनसे यांच्यात चर्चा होईल का? ते दोघे एकत्र येतील का? हा खल कायम आहे.