बीड : प्रतिनिधी
एकेकाळी राजकीय वैर बाळगणारे मुंडे बहीण-भाऊ महायुतीच्या माध्यमातून मात्र पुन्हा एकदा एकत्र आल्याचे दिसले. ज्या घड्याळाने मुंडे बहीण-भावांना वेगळे केले होते. त्याच घड्याळाने या दोघांनाही आता एकत्र आणले आहे. लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंचा प्रचार केला, तर आता बहीण विधानसभा निवडणुकीत भावासाठी प्रचार करत आहे.
केंद्र आणि महाराष्ट्राच्या राजकारणात परळी हे नेहमीच केंद्रबिंदू ठरले आहे. काका-पुतण्यातील वादानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या काकाची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पवारांनी देखील गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांना नेहमीच बळ दिले. मात्र पक्ष फुटीनंतर धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. राष्ट्रवादी महायुतीत सामील झाल्याने विधानसभा निवडणुकीनिमित्त दोघेही मुंडे बहीण-भाऊ एकमेकांच्या राजकीय वाटचालीत साथ देत आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यावेळी दोघा बहीण-भावातील राजकीय वैर महाराष्ट्राने पाहिले. परंतु, लोकसभा निवडणुकीत एकेकाळी सहकारी असणा-या बजरंग सोनवणे यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेत पंकजा मुंडेंसाठी केलेला प्रचारही महाराष्ट्राने पाहिला. आता विधानसभा निवडणुकीनिमित्त आयोजित सभेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे भावूक झालेले देखील महाराष्ट्राने पाहिले.