मुंबई | khabarbat News Network
मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुंबईतील माहीम, वरळी, वांद्रे (पूर्व), मानखुर्द, शिवडी या मतदारसंघातील लढती सर्वाधिक प्रतिष्ठेच्या ठरल्या आहेत.
हे देखील वाचा : … तर लाडक्या बहिणी लाटण्याने मारतील! असं छगन भुजबळ का म्हणाले?
मुंबईतील बहुतांश मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघात ४२० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मुंबईतील ३६ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यात शिवसेना ठाकरे गटाचे २२, काँग्रेस ११ आणि शरद पवार गट २ तसेच एका जागेवर समाजवादी पार्टीने उमेदवार दिला आहे. तर महायुतीकडून भाजप १८, शिंदे गट १६ आणि अजित पवार गट २ जागांवर उमेदवार रिंगणात आहे.
तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत २५ उमेदवार दिले आहेत. यामुळे मराठी मतदारांच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. मनसेच्या उमेदवारांमुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचे आव्हान वाढले आहे.