अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्यामध्ये अटीतटीचा सामना होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी आघाडी घेत ‘बाजीगर’ ठरले. मागच्या काही दिवसात हवेची दिशा बदलल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. ट्रम्प यांच्या विजयामागे ५ प्रमुख कारणे दडली आहेत.

१) डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण लावून धरलं. अमेरिकेत बेकायदा राहणा-यांना त्यांनी विरोध केला. परदेशी लोक अमेरिकन नागरिकांच्या नोक-या हिरावून घेत आहेत असा २०१६ मध्ये प्रचार केला. आपल्या कार्यकाळात अमेरिकेत बेकायदा घुसखोरी रोखण्यासाठी ट्रम्प यांनी मॅक्सिकोच्या सीमेवर भिंत उभारण्यास सुरुवात केली. यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी अमेरिकेत बेकायदा राहणा-यांचा मुद्दा उचलून धरला.
२) विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. बायडेन यांच्या कार्यकाळात सुरू झालेले रशिया-युक्रेन युद्ध अजूनही सुरु आहे. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हमासने इस्रायलवर हल्ला केला. त्यानंतर इस्रायलने जो विनाश सुरु केला तो लेबनान पर्यंत पोहोचला. गाजा आणि लेबनानमध्ये मिळून जवळपास ४६ हजार मृत्यू झाले. त्यामुळे अमेरिकेतील एक मोठा वर्ग आणि मुस्लिम देश नाराज आहे. अमेरिकेकडून युक्रेनला दिली जाणारी सैन्य आणि आर्थिक मदत रोखणार असल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं. अरब-अमेरिकी मतदारांना लेबनान संघर्ष थांबवण्याचे सुद्धा आश्वासन दिलं.
हे देखील वाचा : … तर लाडक्या बहिणी लाटण्याने मारतील! असं छगन भुजबळ का म्हणाले?
३) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठिशी भक्कपणे उभे राहिले. मस्क मागच्या ६ महिन्यापासून ट्रम्प यांच्या विजयासाठी प्रयत्न करत होते. हाय स्टेक पेनसिल्वेनियामध्ये ट्रम्प यांच्या विजयासाठी बराच वेळ आणि ऊर्जा खर्च केली. इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांना पुन्हा आणलं. महत्त्वाच म्हणजे रोज ट्रम्प यांच्या समर्थनार्थ त्यांनी हजारो पोस्ट केल्या.
४) ट्रम्प यांच्या समर्थकांना ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन समर्थक’ म्हटले जाते. या समर्थकांनी सोशल मीडियावर कमला हॅरिस यांच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांना एक कमकुवत दावेदार ठरवलं. मीडियावर ते डेमोक्रॅटिक पार्टीच समर्थन करत असल्याचा आरोप केला. ट्रम्प यांची प्रभावी प्रचार यंत्रणा सुद्धा महत्त्वाची ठरली.
५) डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध चार गुन्हेगारी खटले सुरु आहेत. ही निवडणूक त्यांच्या व्यक्तीगत आणि राजकीय जीवनात निर्णायक ठरु शकणारी होती. विजयामुळे कायदेशीर लढाई कमीत कमी चार वर्षांसाठी टळेल किंवा खटले रद्द होतील अशी स्थिती होती. मात्र त्यांच्याविरुद्ध सुरु असलेल्या खटल्यांचा निर्णय न येणं ही त्यांच्यासाठी सकारात्मक बाब ठरली.
– श्रीपाद सबनीस
Editor, khabarbat.com