नाशिक। विशेष प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील येवला मतदार संघातून छगन भुजबळ हे महायुतीचे उमेदवार आहेत. आज (बुधवार) छगन भुजबळांनी श्रीरामाच्या मंदिरात दर्शन घेऊन प्रचारास प्रारंभ केला. येवल्यात बोलत असताना छगन भुजबळांनी महायुतीच्या लाडकी बहीण योजनेसह अनेक मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीकास्त्र सोडले.
‘हिंदू धर्मात विद्येची देवता सरस्वती पण मुलींना शिक्षण द्यायचं नाही. शौर्याची देवता आई भवानी पण काही झालं तर बायकोला म्हणायचं तू आत थांब मी बोलतो. संपत्तीची देवता लक्ष्मी पण घरच्या लक्ष्मीच्या हातात १० रूपये सुद्धा देत नाही. या सर्व देवींना-देवतांना आपण पूजतो. त्या महिला आहेत. पण काही ठिकाणी महिलांशी कसं वागलं जातं?’, असा सवाल करीत छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले. ते म्हणाले, महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निश्चितपणे पैशांची अडचण निर्माण होणार पण आम्ही तो पैसा निर्माण केला. आणि १५०० रूपये लाभार्थी महिलांना देऊन लाडकी बहीण योजना सुरू केली. आज राज्यात २ कोटींहून अधिक महिलांना हे पैसे पोहोचलेत. पण विरोधक म्हणत आहेत की, आम्ही आलो की योजना बंद करू, असे म्हणत छगन भुजबळांनी विरोधकांवरच टोला लगावत तुम्ही सत्तेत येणार नसल्याचे वक्तव्य केले. आम्हीच पुन्हा निवडून येणार आहोत. मंत्रिमंडळात आम्ही असणारच असा विश्वास छगन भुजबळांनी व्यक्त केला. ते म्हणाले, जर ही योजना आम्ही सुरू ठेवली नाही तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील.