khabarbat

Laturkar also feels that vote share will depend on how successful Amit Deshmukh is in controlling the activities of secret enemies.

Advertisement

Latur MLA election 2024 | अमित देशमुखांच्या विजय रथासमोर अदृश्य शक्तींचे ‘स्पीड ब्रेकर’!

 

लातूर मतदार संघ | ग्राऊंड रिपोर्ट 

दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर या दोन नेत्यांमुळे लातूरची आजही राजकीय वर्तुळात खास ओळख आहे. विलासराव देशमुखांच्या नंतर अमित देशमुख त्यांचा राजकीय वारसा चालवत आहेत. २००९ पासून ते लातूरचे आमदार आहेत. त्यांचे लहान भाऊ धीरज देशमुख मागील विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. यंदाही अमित आणि धीरज या देशमुख बंधूंना अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने उमेदवारी दिली. लातूर शहरात अमित देशमुखांविरुद्ध भाजपने शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी देत चुरस निर्माण केली.

अर्चना पाटील २०१९ साली लातूर ग्रामीणमधून विधानसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होत्या. पण, काँग्रेसने त्यांची निराशा करत धीरज देशमुखांना उमेदवारी दिली. या सेटबॅकनंतरच त्यांना पक्षात आणण्यासाठी भाजप नेते प्रयत्नशील होते.

अखेर यंदा (२०२४) च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्चना पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये पाऊल टाकले. अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरच त्या अमित देशमुखांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणार असा कयास लातूरकर मंडळी व्यक्त करीत होती. भाजपने तिस-या यादीमध्ये त्यांचा समावेश करत या गृहीतकावर शिक्कामोर्तब केले.

अमित देशमुखांना आव्हान कितपत?
शिवराज पाटील यांचे राजकीय शिष्य समजले जाणारे माजी आमदार बसवराज पाटील, शेजारच्या नांदेड जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अर्चना पाटील यांनाही पक्षात घेऊन भाजपने अमित देशमुखांच्या गढीला आव्हान देण्याची तयारी पूर्वीपासूनच सुरु केली. लातूर विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे. अर्चना पाटील त्याच समाजातील आहेत. या मतदारांनी शिवराज पाटील यांना नेहमीच साथ दिली. विलासराव देशमुखांच्या १९९५ साली झालेल्या पराभवात लिंगायत मतदारांची भूमिका निर्णायक ठरली होती.

सुधाकर शृंगारे काँग्रेसमध्ये…
अमित देशमुख हे मराठा समाजातील उमेदवार आहेत. त्याचबरोबर जरांगे फॅक्टरचाही भाजपला सुप्त धोका आहे. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी लिंगायत समाजातील तगडा उमेदवार देऊन लातूरच्या पटावर भाजपने राजकीय चाल खेळली. मात्र माजी खासदार सुधाकर शृंगारे यांना काँग्रेसमध्ये सामिल करून घेत अमित देशमुख यांनी भाजपला तोडीस तोड चेकमेट देण्याचा काहीसा प्रयत्न केला. सुधाकर शृंगारे यांचा जनाधार आता देशमुख परिवाराच्या सोबत उभा राहणार हे निश्चित. या स्थानिक पातळीवरील राजकीय डावपेचातून नेमका संदेश देण्याचे काम निश्चितपणे पार पडले. दलित मतांची विभागणी होण्याची जी भीती अनेकांना होती ती काहीशी घालविण्यात देखील यामुळे यश आले, ही एक जमेची बाजू म्हणता येईल असे स्थानिक लातूरकर मतदारांना वाटते. आता आजूबाजूच्या कथित हितचिंतक किंबहुना गुप्त हितशत्रूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात अमित देशमुख कितपत यशस्वी ठरतात, त्यावर त्यांचे मताधिक्य अवलंबून राहणार आहे, असेही लातूरकरांना वाटते.

काठावरच्या मतदारांना पर्याय
अर्चना पाटील यांची स्वच्छ राजकीय प्रतिमा, सामाजिक कार्यातील त्यांचा सक्रीय सहभाग तसेच एक सुशिक्षित महिला म्हणून मतदारांवर असलेली छाप हे फॅक्टर देखील या निवडणुकीत महत्त्वाचे ठरु शकतात. लातूर शहरात भाजपचीही पारंपारिक मते आहेत. त्यांचा देखील अर्चना पाटील यांना फायदा होऊ शकतो. अमित देशमुख २००९ पासून सातत्याने लातूर शहराचे आमदार आहेत. त्यामुळे यंदा बदल करण्यास इच्छूक असलेल्या, तसेच काठावरच्या मतदारांनाही अर्चना पाटील यांच्या रुपाने पर्याय मिळाला आहे. अर्चना पाटील यांच्या बाजूने काही फॅक्टर नक्कीच आहेत. भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीची चर्चा नेहमीच रंगते. या गटबाजीमुळेच अर्चना पाटील यांचे नाव जाहीर होण्यास उशीर झाला असे मानले जाते. या स्थानिक गटबाजीचा अडसर त्या किती प्रमाणात दूर करू शकतील, यावर त्यांचा जय-पराजय ठरेल.

देशमुखांच्या गढीला प्रबळ आव्हान नाही…
लातूर शहरात अमित देशमुखांचा पारंपारिक मतदार मोठ्या प्रमाणात आहे. भाजपचा उमेदवार ठरण्यापूर्वीच त्यांनी प्रचारात आघाडी घेतली. महत्वाची बाब म्हणजे काँग्रेसमध्ये अमित देशमुखांसमोर कोणतेही प्रबळ आव्हान नाही. विलासराव देशमुख आणि शिवराज पाटील- चाकूरकर यांनी साधारण एकाच काळात काँग्रेस पक्षातून राजकारण सुरु केले. आता त्यांची दुसरी पिढी राजकारणात सक्रीय आहे. या (२०२४) निवडणुकीत ती आमने-सामने आली आहे. लातूर शहराच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणा-या या दोघांच्या पुढच्या पिढीतील व्यक्तींमध्ये होत असलेल्या या थेट लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचे नेटवर्क, भाजपचा प्रभाव
लातूर शहर मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांचे जाळे, नेटवर्क तगडे आहे, हे मान्य करावे लागेल. मागील तीनही निवडणुकांमध्ये माजी मंत्री आ. अमित देशमुख मोठ्या फरकाने विजयी झाले. त्याचवेळी २०१४ आणि २०१९च्या निवडणुकीत भाजपाने ७० हजारांवर मते घेत मतांचा सुमारे ३३ ते ३४ टक्के वाटा मिळविला होता. त्यामुळे ही मते भाजपची म्हणून पक्की ठरू शकतात, तर काँग्रेसला तिन्ही निवडणुकांमध्ये अनुक्रमे ६४.९१ टक्के, ५८.८२ व ५२.४८ टक्के मते मिळाली होती. तात्पर्य, मत विभाजनासोबतच भाजपच्या मतांच्या टक्केवारीत वाढ दिसत असून कॉँग्रेसचा उमेदवार विजयी होत असला तरी मतांची टक्केवारी घसरणीला लागलेली दिसत आहे. ही पार्श्वभूमी विचारात घेता अमित देशमुखांना भाजपकडून मोठा दगाफटका होण्याची चिन्हे तूर्त तरी दिसत नाहीत. मात्र पुनर्रचनेनंतरच्या चौथ्या निवडणुकीत भाजपने डॉ. अर्चना पाटील-चाकूरकर यांना उमेदवारी देऊन लातूर विधानसभेची निवडणूक चर्चेत आणली आहे, हे निश्चित!

– श्रीपाद सबनीस

s4shripad@gmail.com

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »