khabarbat News Network
नांदेड : काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली. काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे AIMIM चे नेते इम्तियाज जलील यांनी देखील नांदेडमधून पोटनिवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली. यामुळे भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. (Nanded Bye Election 2024)
MIM च्या एन्ट्रीमुळे होणा-या मतविभाजनाचा फायदा साधण्यासाठी भाजपतील इच्छूकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. एक मात्र खरे की, MIM च्या उमेदवारीने भाजप प्रमाणेच कॉँग्रेसचीही डोकेदुखी वाढणार आहे. कारण, इम्तियाज जलील यांना एकगठ्ठा मतदान येथे होऊ शकते. मुस्लिम समाजातील मतदान सुमारे ५ लाखांच्या आसपास आहे. ही उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी मनोज जरांगे यांच्याशी त्यांनी साधलेले संधान देखील उल्लेखनिय बाब ठरते. आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाज आणि मुस्लिम मतदार एकवटला तर कदाचित Congress आणि BJP ला धोबीपछाड देत ‘एमआयएम’ ही पोटनिवडणूक जिंकू शकते, अशी शक्यताही नाकारता येत नाही.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ही जागा भाजपच्या ताब्यातून मिळवली होती. वसंतराव चव्हाण यांना ५,२८,८९४ मतं मिळाली. प्रताप पाटील चिखलीकर यांना ४,६९,४५२ मते मिळाली. वसंतराव चव्हाण यांनी नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव आणि देगलूर या मतदारसंघात आघाडी घेतली होती. प्रताप पाटील चिखलीकर यांना भोकर आणि मुखेडमध्ये आघाडी मिळाली. (Latest Nanded News)
२०१९ मध्ये एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. यशपाल भिंगे यांनी १ लाख ६६ हजार १९६ मते घेतली होती. सेक्युलर मतांच्या विभाजनामुळे अशोक चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदाच्या पोटनिवडणुकीत एमआयएमच्या उमेदवारीने काँग्रेसने टेन्शन वाढले असून वंचित आघाडी काय भूमिका घेणार? तसेच, जरांगे फॅक्टरही आता किती निर्णायक ठरेल याचीही उत्सुकता आहे.