अबूधाबी : वृत्तसंस्था
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (king khan) सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही त्याचा उत्साह कायम आहे. नुकतेच शाहरुख खानने अबूधाबीत पार पडलेल्या IIFA Awards 2024 सोहळ्याचे होस्टिंग केले. यावेळी शाहरूख (shahrukh khan) खानने निवृत्ती घेण्याविषयी विधान केले.
होस्ट करताना शाहरुखने मस्करीत करण जोहरला उद्देशून म्हटले, महापुरुषांची सर्वात मोठी गुणवत्ता म्हणजे, त्यांना कधी थांबायचे आणि कधी निवृत्त व्हायचे, हे माहीत असते. जसे सचिन तेंडुलकर, सुनील छेत्री आणि रॉजर फेडरर. मला वाटते की करण तुझीही आता निवृत्ती घ्यायची वेळ आली आहे.
जर असे असेल तर मग शाहरुख कधी निवृत्ती घेणार, असे करण म्हणाला. करणच्या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुख म्हणाला, मी थोड्या वेगळा प्रकारचा दिग्गज आहे. मी एमएस धोनीसारखा आहे. नाही नाही म्हणत आयपीएलचे 10 सीझन खेळून घेतो. त्यानंतर विकी कौशलने शाहरुख खानचे कौतुक करत म्हटले, निवृत्ती ही दिग्गजांसाठी असते, बादशाहा कायमचे असतात. दरम्यान, या IIFA Awards 2024 सोहळ्यात शाहरुख खानला ‘जवान’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.