अहमदनगर : सध्या राज्यभरात धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. अहमदनगरच्या (Ahmednagar News) नेवासा फाटा येथे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी उपोषण सुरु आहे. मात्र सरकार या आंदोलनाची दाखल घेत नसल्याने जलसमाधीचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला. त्यातच आता दोन आंदोलक उपोषणस्थळावरून बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा फाटा येथे धनगर समाजाचे उपोषण सुरु आहे. आज या उपोषणामधून दोन आंदोलक अचनक बेपता झाले आहेत. या आंदोलकांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता.
यानंतर आता दोन आंदोलक बेपत्ता झाले आहेत. प्रल्हाद सोरमारे आणी बाळासाहेब कोळसे असे या आंदोलकांची नावे आहेत. आम्ही जलसमाधी घेत आहोत. यास सर्वस्वी सरकार जबाबदार अशा मजकुराची चिठ्ठी जिल्ह्यातील प्रवरासंगम येथील गोदावरी नदीकाठी आढळून आली आहे.