वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
पेजर स्फोटाचा धसका फक्त लेबनॉननेच घेतला नाही तर अमेरिकेनेही घेतला आहे. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाला सुरक्षेची चिंता भेडसावू लागली आहे. यामुळे अमेरिकेत वापरल्या जाणा-या गाड्यांमधील चीनी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरवर बंदी आणण्याचा विचार सुरु झाला आहे.
अमेरिकेचे वाणिज्य सचिव जीना रेमोंडो यांनी म्हटले आहे की, रस्त्यावर लाखो गाड्या चालत असतील आणि अचानक सॉफ्टवेअर निष्क्रीय केले गेले तर किती मोठा विनाश होईल. यामुळे चीनमधून आयात होणा-या ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग सिस्टम सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर असलेल्या वाहनांच्या आयात आणि विक्रीवर बंदी घालण्याचा विचार आहे.
अमेरिकन रस्त्यावर धावणारी जवळपास सर्व वाहने कनेक्टेड आहेत. या वाहनांमध्ये ऑनबोर्ड नेटवर्क हार्डवेअर आहे. त्यातून इंटरनेटच्या माध्यमातून गाडी आत आणि बाहेर दोन्ही डिव्हाइससह डेटा शेअर करते. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील खासदारांनी एक चिंता व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, चिनी ऑटो आणि टेक कंपन्या वाहनांची चाचणी करताना संवेदनशील डेटा गोळा करतात. हा डेटा ते भविष्यात वापरु शकतात.
ब्रिटीश मीडियाच्या अहवालात असा दावा करण्यात आला होता की, गुप्तचर अधिका-यांना चिनी स्पायवेअरबद्दल च्ािंता व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी शासकीय व मुत्सद्दी वाहनांची तपासणी करून घेतली होती. तपासणीत किमान एक सिम कार्ड सापडले जे लोकेशनचा डेटा पाठवत होते. हे उपकरण एका चिनी पुरवठादाराकडून खरेदी करण्यात आले होते.
पेजर स्फोटानंतर धोका वाढला
लेबनॉनमध्ये पेजर आणि वॉकी-टॉकी स्फोटापूर्वी इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे हेरगिरीचे काम केले जाऊ शकते, असे मानले जात होते. परंतु आता या स्फोटानंतर नवीन प्रकारच्या युद्धाचा धोका वाढला आहे. खूप लांब राहून इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे स्फोट घडविला जाऊ शकतो. यामुळे निष्क्रीय करुन मोठा विनाश घडविण्याची शक्यता आहे. चीनमधील शेन्झेन येथील हुआई ही दूरसंचार कंपनी, अनेक वर्षांपासून चीन आणि अमेरिका यांच्यातील तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी आहे. अमेरिकन अधिका-यांनी याबाबत इशारा दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, चिनी अधिकारी हे उपकरण हेरगिरीसाठी वापरू शकतात. मात्र, चीनने हे आरोप फेटाळले आहेत.