नवी दिल्ली I आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंध्र प्रदेश सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. त्यांनी आंध्रच्या तेलगू देसम पक्षावर राजकीय सूडबुद्धीने काम केल्याचा आरोप केला आहे. जगन मोहन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारवर राज्यात हिंसाचार पसरवल्याचा आणि वायएसआरसीपी कार्यकर्त्यांना लक्ष केल्याचा आरोप केला.

दरम्यान, आता या आंदोलनाला राजकीय वर्तुळातून पाठिंबा मिळत आहे. विरोधी पक्षांकडून पाठिंबा दिला जात आहे. या आंदोलनाला इंडिया आघाडीनेही पाठिंबा दिल्याचे दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि खासदार अखिलेश यादव यांनी रेड्डी यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. यामुळे आता जगन मोहन रेड्डी इंडिया आघाडीत सामिल होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
सपा प्रमुख अखिलेश यादव आणि राम गोपाल यादव यांनी जगन मोहन यांच्या आंदोलनात हजेरी लावली, तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी आणि अरविंद सावंत यांनीही हजेरी लावली. यावेळी टीएमसीचे नजीबुल हक आणि जेएमएमचे विजय हंसडा, आम आदमी पक्षाचे नेते राजेंद्र पाल गौतम आणि एआयएडीएमके नेते थंबी दुराई यांनीही रेड्डी यांना पाठिंबा दिला. यादरम्यान, तामिळनाडूच्या व्हीसीके पक्षाने जगन मोहन यांना इंडिया आघाडीसोबत येण्याचे आवाहन केले.
दुसरीकडे, जगन मोहन रेड्डी यांनी एनडीएकडे १५ खासदार असल्याची आठवण करून दिली. वायएसआरसीपीचे राज्यसभेत ११ खासदार आहेत, तर लोकसभेत टीडीपीच्या खासदारांची संख्या १६ आहे. या पक्षाचे लोकसभेत ४ खासदार आहेत. आमची आणि टीडीपीची ताकद समान आहे, अशी आठवणही त्यांनी करुन दिली.