khabarbat News Network
बीड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेली बीडमधील मनोज जरांगे यांची रॅली शांततेत पार पडली. शहरभर सुनामी लोटावी असा जनसमुदाय लोटला होता. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरुन जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन सरकार आणि विरोधक दोघांवरही हल्लाबोल केला. आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मुंडे बंधु-भगिनींवर आणि मराठा आरक्षणाला विरोध करणा-या सर्वांनाच त्यांनी फैलावर घेतले.

जरांगे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मराठा-ओबीसी आरक्षणासंदर्भाने राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच, गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही का, असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला.
At the very beginning of his speech at Beed, Manoj Jarange raised the issue of the all-party meeting called by the state government with reference to Maratha-OBC reservation and attacked the ruling party and the opposition.
मराठ्याचे मतदान घ्यायला गोड लागते का, असे म्हणत मनोज जरांगेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला, मला तर वाटतंय हे दोन्हीही एकच आहेत. कारण, तू मारल्यावनी कर, मी रडल्यावनी करतो, असंच यांचं काम दिसतंय. दोघेही एकमेकांवर का ढकलतात. जर महाविकास आघाडीवाले सर्वपक्षीय बैठकीला आले नाहीत, मग सरकारची इच्छाशक्ती असेल तर सरकार का करत नाही?. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, कधीतरी जनतेकडे बघा. ते नाही आले म्हणता, मग तुम्ही का दिलं नाही. तुमचीच इच्छा नाही आम्हाला आरक्षण द्यायची, असे जरांगे यांनी म्हटले.
मुंडे बंधु-भगिनींवर निशाणा
तुम्हाला राज्यात किंग राहायचे आहे, जिल्ह्यात किंग राहायचं आहे, मग मराठ्यांना गोड बोला. तुमची जात एक झाली, आम्हाला आनंद झाला. पण, माझी जात एक झाली, मग तुमच्या का पोटात दुखायला लागलं. तुम्ही जातीवाद करणार, तुम्ही मतं मराठ्यांची घेणार, तुम्ही शिरुर, आष्टी, गेवराईजवळच्या पोरांना मारणार. पण, आमची शांतता आणि संयम आहे, म्हणजे आम्ही भीतोत असं तुम्हाला वाटतं का?, असे म्हणत मुंडें बंधु-भगिनींवर हल्लाबोल केला. आपल्या विचारांचा एखादा ओबीसी निवडून दिला तरी चालतो, पण मराठ्यांना विरोध करणारा चालणार नाही, असे म्हणत जरांगेंनी नाव न घेता पुन्हा एकदा मुंडेंवर हल्लाबोल केला.