Khabarbat News Network
संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) ज्युनिअर विद्यार्थ्याची सीनिअर्संकडून रॅगिंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन सीनिअर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून ६ महिन्यांसाठी सस्पेंड करण्यात आले आहे. तसेच त्यांना हाॅस्टेलमध्ये कायमस्वरुपी प्रतिबंध करण्यात आला आहे आणि प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे, तर रॅगिंगच्या वेळी उपस्थित असलेल्या अन्य तीन विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी हाॅस्टेल आणि ग्रंथालयात प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच त्यांनाही प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.

घाटीतील द्वितीय वर्षातील एका विद्यार्थ्याने रुग्णालय प्रशासन आणि अँटी रॅगिंग कमिटीकडे यासंदर्भात तक्रार केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अँटी रॅगिंग कमिटीने तातडीने बैठक घेऊन विद्यार्थ्यांची तक्रारनुसार चौकशी केली. या चौकशीअंती रॅगिंग झाल्याचे स्पष्ट झाले. समितीच्या अहवालानंतर अधिष्ठाता शिवाजी सुक्रे यांनी याप्रकरणी नॅशनल मेडिकल काऊन्सिलच्या (एनएमसी) नियमानुसार कारवाई केली.
काय केले रॅगिंगमध्ये ?
तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षातील काही वर्षांना ७ जून रोजी रात्री ओल्ड बाॅईज हाॅस्टेलमध्ये बोलावले. यावेळी सीनिअर्सनी ज्युनिअर विद्यार्थ्यांसोबत असभ्य भाषेत संवाद साधला. सिगारेट आणून द्या, मद्य आणून द्या, असे म्हणत काॅलर धरण्याचाही प्रकार केला. यामुळे संबंधित ज्युनिअर विद्यार्थी भयभीत झाला होता. अशा अवस्थेत त्याने तक्रार केली. त्याची स्थिती पाहून वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे यांनी त्याला धीर दिला. या घटनेनंतर तो विद्यार्थी आई-वडिलांसोबत गेला.