खबरबात न्यूज नेटवर्क

संभाजीनगर : शहरामध्ये सध्या गब्बर चांगलाच चर्चेत आला आहे. प्रशासनातील विशेषत: पोलिस प्रशानातील भ्रष्ट अधिका-यांना टार्गेट ठरवून हा गब्बर पुढे आला आहे, असे पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या निनावी पत्रावरून स्पष्ट होते.
अभिनेता अक्षयकुमारच्या गब्बर या चित्रपटातील पात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये अवतरले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सोशल मीडियावर अशाच आशयाचे एका गब्बरचे पत्र व्हायरल झाले आहे.
आपण शंभर लोकांची गँग तयार केली असून, लवकरच संभाजीनगर मधील भ्रष्टाचारी अधिका-यांचे हत्याकांड करणार असल्याचा दावा या पत्रात केला आहे. विशेष म्हणजे हे कृत्य भर चौकात करणार असल्याचे या पत्रात म्हटले आहे. तसेच, या पत्रात सूचना देताना माझ्या केसाला जर धक्का लागला तर पालकमंत्री संदीपान भुमरे यांना जीवेच मारू, असेही म्हटले आहे. या पत्रामुळे पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे स्वत:ला गब्बर म्हणवणा-या या व्यक्तीने ‘रिश्वत मत लेना वरना गब्बर आ जायेगा’ असा उल्लेख पत्रात केला आहे. त्यामुळे संभाजीनगरमध्ये या गब्बरची जोरदार चर्चा होत असून हा गब्बर कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.