राज्यातील प्रमुख लढतींपैकी एक असलेल्या बीड लोकसभा निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडेंसाठी प्रतिष्ठेची निवडणूक असलेल्या या मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळत आहे.

राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी निवडणूक होत आहे. मात्र, बीड लोकसभा मतदारसंघ याला अपवाद आहे. कारण, बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी पारंपारिक लढत होत असून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे यंदा ही लढाई टोकाला पोहोचल्याचे दिसून येत आहे.
पंकजा मुंडेंना बीडमधून बजरंग सोनवणे यांचे म्हणजे मराठा उमेदवाराचे आव्हान आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीचा बीड हा केंद्रबिंदू असल्याने यंदा येथील निवडणुकीतील जातीय रंग गहिरा बनल्याचे दिसत आहे.
बीड जिल्ह्यात यापूर्वी जेवढे खासदार निवडून आले त्यांची जात कधीच काढली गेली नाही, असे सांगत धनंजय मुंडे यांनी आजपर्यंतच्या खासदारांची यादीच वाचून दाखविली. तसेच, आता आमची जात का काढली जातेय, असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान, जाहीर भाषणामध्ये धनंजय मुंडे यांनी निवडणुकीत जात आल्याचे म्हटल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी देखील त्यांना प्रत्त्युत्तर दिले. या निवडणुकीमध्ये आमच्यासाठी कोणतीही जात हा मुद्दा नाही, आम्ही सेक्युलर विचाराचे आहोत. याउलट धनंजय मुंडेच निवडणुकीत जात फॅक्टर चालवत असल्याचा आरोप सोनवणे यांनी केला.
बीड जिल्ह्यातील जातनिहाय मतांची आकडेवारी अंदाजे पुढीलप्रमाणे…
मराठा – सात ते साडेसात लाख.
वंजारी – साडेचार ते पाच लाख.
दलित – दोन ते सव्वा दोन लाख.
मुस्लिम – सव्वा दोन ते अडीच लाख.
ओबीसी – म्हणजेच माळी आणि धनगर दोन ते अडीच लाख.
एकुणात बीड जिल्ह्यात २१ लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत.
बीड जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये जातीचा मुद्दा पुढे येण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे बीडमध्ये झालेले मराठा आरक्षणाचे तीव्र आंदोलन आणि त्यातच लागलेल्या लोकसभेच्या निवडणुका. यंदाच्या निवडणुकात मराठा आणि ओबीसी उमेदवार एकमेकांसमोर उभे असल्याने दोन्ही समाजामध्ये आता जातीय तेढ निर्माण होताना पाहायला मिळत आहे. यापूर्वी देखील लोकसभा निवडणुकीत जातीचा मुद्दा असायचा. मात्र, यावेळेस या मुद्द्याला जास्त हवा मिळत असून याचे परिणाम येणा-या विधानसभा निवडणुकीवरही होतील, असे दिसते.
बीड जिल्ह्याची खंत वाटते
बीडमध्ये सध्या जातीच्या मुद्द्यावरून प्रचार सुरू असताना दुसरीकडे पंकजा मुंडे यांना दोन ठिकाणी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा बांधवांच्या आक्रोशाचा सामना करावा लागला. त्यामुळे, पंकजा मुंडे यांनी हे मराठा आंदोलन नसून मुद्दाम जातीय तेढ निर्माण करण्यासाठी सुरू असलेला प्रायोजित कार्यक्रम असल्याचे म्हटले.
बीड जिल्ह्यात यापूर्वी असे वातावरण निवडणुकीत कधीच पाहायला मिळाले नाही. बीड जिल्ह्यात सध्या जे चित्र निर्माण झाले, त्यामुळे बीड जिल्ह्याच्या भवितव्याची चिंता वाटत असल्याची खंत पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली.
मराठा विरूद्ध वंजारी : पूर्वापार संघर्ष
दरम्यान, बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीला जातीय रंग हा काही पहिल्यांदा लावला जातोय असे अजिबात नाही भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बीडची लढत कायम मराठा विरुद्ध वंजारी अशीच राहिलेली आहे.
मात्र, या निवडणुकीमध्ये जाती जातीतील तेढ रस्त्यावर पाहायला मिळत आहे. पण, हा जातीयवाद असाच फोफावत राहिला तर भविष्यातील राजकारणाविषयी ही धोक्याची घंटा आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.