पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी गुरूवारी शरद पवार गटाची वाट धरत ‘तुतारी’ फुंकली. पुण्यातील पक्षकार्यालयात त्यांनी शरद पवार यांची भेट घेत अनौपचारिक प्रवेश केला. ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
बुधवारी भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण २० जणांचा समावेश आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने निलेश लंकेंनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
नगर दक्षिणमधून लंकेंना उमेदवारी?
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांची लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. मागील दोन वर्षापासून ते लोकसभेची तयारी करत असल्याचे चित्र आहे. निलेश लंकेंना जर महाविकास आघाडीतून नगर दक्षिणसाठी उमेदवारी मिळाली तर डॉ. सुजय विखे पाटलांना तगडे आव्हान मिळू शकते.
नगर दक्षिणचे राजकीय समिकरण
अहमदनगर (ahmadnagar) दक्षिणमध्ये विखे पाटलांचे पक्षांतर्गत शत्रू वाढत चालल्याचे दिसून येत आहे. कर्जत जामखेडमधून (Rohit Pawar) रोहित पवार, राहुरीमधून प्राजक्त तनपुरे हे निलेश लंके (nilesh lanke) यांना अधिक मताधिक्य मिळावे यासाठी प्रयत्न न करतील तरच नवल. निलेश लंकेंना काही मदत लागली तर आम्ही आहोतच हे शरद पवार (sharad pawar) यांचे आश्वासक विधान या संदर्भात बरेचसे बोलके ठरावे.
श्रीगोंद्यात भाजपचे बबनराव पाचपुते आणि शेवगावमध्ये मोनिका राजळे आमदार असले तरी राष्ट्रवादीचा विरोधी गट देखील कमालीचा सक्रीय आहे. भाजपचे आमदार राम शिंदे, युवा नेते विवेक कोल्हे उघड-उघड लंके यांना मदत करत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. यामुळे जर लंके विरुद्ध विखे (vikhe) लढत झाली तर लंके हे सुजय विखेंना काट्याची टक्कर देवू शकतात.
दरम्यान, विखे पाटलांचे कट्टर विरोधक मानले जाणारे बाळासाहेब थोरात म्हणाले की, निलेश लंके जर शरद पवार गटात आले आणि ते अहमदनगर दक्षिणमधून निवडणूक लढले तर त्यांचा निश्चितच विजय होईल. निलेश लंकेंनी खूप लोकप्रियता मिळवली आहे. सर्वसामान्य, काम करणारे तरुण अशी त्यांची ओळख आहे. लंके मोठ्या मताने विजयी होतील, अशा मला विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले. नगर (nagar) जिल्ह्यातील बाळासाहेब थोरात (thorat) यांचा देखील लंकेंना विजयी गुलाल उधळण्यासाठी हातभार लागणार हे निश्चित. आता निलेश लंकेंना नगर दक्षिणसाठी महाविकास आघाडीतून तिकीट मिळणार का? याकडे तूर्त सा-यांच्या नजरा लागल्या आहेत.