तिरूपती : वैदिक ज्योतिष्य शास्त्रात राहू-केतू यांना विशेष महत्व आहे. जर कुंडलीत या दोन ग्रहांची स्थिती ठीक नसेल तर जीवनात अस्थिरता येऊ शकते असे मानले जाते. त्यामुळे राहू-केतूची पूजा-उपासना केली जाते. भारतीय परंपरेत या पूजेला विशेष महत्व आहे. मात्र रविवारी तिरुपती येथील श्रीकालहस्ती मंदिरात ३० रशियन पर्यटकांनी राहू-केतूची अर्चना केली.
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील श्रीकालहस्ती येथे भगवान शंकराचे हे मंदिर आहे. याला दक्षिणेचे कैलास आणि काशी असेही म्हणतात. पेन्नार नदीची शाखा असलेल्या स्वर्णमुखी नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर राहू-केतू मंदिर म्हणूनही ओळखले जाते. राहू-केतूला शांत करण्यासाठी जगभरातून लोक येतात. येथे असलेले शिवलिंग हे वायू तत्वाचे मानले जाते, त्यामुळे पुजारीही त्याला स्पर्श करत नाहीत. मूर्तीच्या शेजारी सोन्याचा पट आहे, तिथे पुष्पहार अर्पण केला जातो. भगवान शंकराच्या तीर्थक्षेत्रांमध्ये या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे.
राहू-केतूच्या शांतीपूजेसाठी हे मंदिर जगभर प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की कोणी येथे येऊन शांतीपाठ केल्यास त्याचे संकट दूर होतात. राहू आणि केतूच्या ज्योतिषीय प्रभावापासून त्याचे रक्षण होऊ शकते. पौराणिक कथेनुसार, चारही युगांमध्ये ब्रह्मदेवाने या ठिकाणी कालहस्तेश्वराची पूजा केली होती. श्रीकालहस्ती मंदिराला भूतकाळातील आणि वर्तमान जीवनातील सर्व पापे धुवून टाकणारी शक्ती मानले जाते.