अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्याचा दिवस आता समीप येऊन ठेपला आहे. या मूर्तीचे अनावरण १७ जानेवारी रोजी केले जाणार आहे. तथापि, प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत श्रीराम मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाणार आहे. यामागे शास्त्र असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की जेव्हा कोणी भक्त दर्शन घेतो त्यावेळी तो देवाच्या डोळ्यात पाहतो. अशावेळी देव आणि भक्त यांच्या नजरेच्या मिलनातून भावनांची देवाण-घेवाण होते. अशावेळी भगवान वशीभूत होतात आणि आपल्या प्रिय भक्तासोबत कोठेही जाण्यास तयार होतात. कलियुगामध्ये असे घडल्याचा दाखला सांगितला जातो. हीच मान्यता लक्षात घेऊन यात्रेदरम्यान रामलल्लाच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाणार आहे. प्राण प्रतिष्ठेनंतरच ही पट्टी काढण्यात येणार आहे.
राम मंदिराच्या सोहळ्यासाठी देशभरात तयारी सुरु करण्यात आली आहे. देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २२ जानेवारी हा एक ऐतिहासिक दिवस ठरणार असे दिसते. १६ जानेवारी ते २२ जानेवारीपर्यंत विविध पूजा विधींच्या माध्यमातून राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होईल.
प्राणप्रतिष्ठेसाठी ८००० पेक्षा अधिक मान्यवर अयोध्येत येणार आहेत. यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.