बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने बिहारमध्ये जात जनगणनेचा अहवाल सादर केला. या अहवालानंतर संपूर्ण देशात याच्या प्रतिक्रिया उमटल्या. काही जण हे तोट्याचे असल्याचे म्हणत आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी या अहवालावरून राजकारण तापले आहे. या विषयावर आतापर्यंत काँग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याचे समर्थन केले असनू यावर आपले मत मांडले आहे.
यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याविषयी ट्विट केले असून संपूर्ण देशात जातीनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केली.
यावेळी ते म्हणाले की , संविधान निर्मात्यांनी या देशात आरक्षण देण्यासाठी निकष म्हणून जात हे एकक वापरले आहे. याचे कारण आपल्या देशाची रचना हजारो वर्ष जातींच्या उतरंडीवर उभी आहे.
म्हणूनच आजच्या घडीला देशात विकासाची धोरणे आखताना कोणत्या जातीची नक्की संख्या किती आहे, हे निर्धारित होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपूर्ण देशभरात जातिनिहाय जनगणनेची आग्रही मागणी करत आहे.