स्वामी रामानंद तीर्थ 22 जानेवारी 1972 ला कालवश झाले. आता तर ते अक्षरशः काळाच्या उदरात सामावून गेले, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे प्रणेते, म. गांधी-वल्लभभाई पटेल यांच्या कणखर वैचारिकतेचा वारसा सांभाळत निजामशाहीतून मराठवाडा विभागाला मुक्ती देणारे धुरंधर नेते, आणि स्वातंत्र्यानंतर सत्तेपासून दूर राहून रचनात्मक कामात रमणारे, कोणतेही पाश, मोहमाया न बाळगणारे संन्यासी. त्यांना खरे तर परिव्राजक म्हटले जायचे. म्हणजे व्रत घेऊन संन्यस्त राहणारी व्यक्ती… म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ!!
एक असा स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांचा नेता की ज्यांचे तीन स्वीय सहाय्यक (PA) पुढे कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि एक पंतप्रधानही! (पी.व्ही. नरसिंहराव, विरेन्द्र पाटील आणि शंकरराव चव्हाण)
… पण त्यांची उपेक्षा होतच राहिली. अर्थात संन्यासी असल्याने मागे कोणीच नाही, जे त्यांचे लढ्यातील साथीदार होते ते सुदधा त्यांच्याच विचारांचे पाईक. कुठे खटपटी-लटपटी करायच्या? कोणासमोर
हात पसरायचे? आणि आपले गुणगान नंतर कोणी गावे, ही अपेक्षा तरी का? ‘आपण काय मोठे तीर मारले की, मागील पिढीने उगाच या स्मृती जपाव्यात, आणि करायचे काय स्मृती जपून तरी’…
हे माझ्याच वडिलांनी (अनंत भालेराव) गोविंदभाई श्रॉफ यांच्या सांगण्यावरून 1984 मध्ये मराठवाडा मुक्तीसंग्रामावर जो ग्रंथ लिहिला त्याच्या प्रस्तावनेत वरील भावना साधारणपणे व्यक्त केल्या आहेत. काही स्वातंत्र्य सैनिकांची मनोगते, कथने वाचली तर अशीच वृत्ती दिसते.
स्वामीजी गेल्यावर 25 जानेवारी 1972 रोजी दैनिक मराठवाड्यात अनंतराव यांनी संतापून एक अग्रलेख लिहिला, मथळा होता…
‘स्वामीजी, होय आम्ही कृतघ्न आहो!’
या संतापाचे कारण होते स्वामीजींच्या निधनानंतर महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी आणि राजकीय पक्षांनी या महान नेत्याप्रति आदर, प्रेम, शोक दाखवण्यासाठी काहीही केले नाही. आणि तिकडे आंध्र प्रदेशात सरकारी दुखवटा पाळला गेला, राष्ट्रध्वज अर्ध्यावर आले आणि हजारो लोक अंत्यदर्शनास आले होते.
स्वामीजी संन्यस्त असल्याने त्यांनी मृत्यूपूर्वी सांगूनच ठेवले होते की, सन्यस्तधर्माला अनुसरून माझ्या शवाचे काहीतरी करावे लागणार आहे ते करा! धर्म-कर्म आणि मंत्र-तंत्र नको!’
गीतेतील श्लोक आणि कुराणातील आयताच्या पठणात स्वामीजींचे पार्थिव समाधिस्थ झाले होते.
आजही तो अग्रलेख आठवतो
“प्रश्न दिवंगत होणाऱ्याचा नाही, त्यांच्यानंतर जिवंत राहणाऱ्याच्या मनाच्या औदार्याचा, सुसंस्कृतपणाचा, कृतज्ञतेचा आणि कर्तव्यभावनेचा आहे. आंध्रच्या लोकांनी तुमच्या महनीय कामगिरीची आठवण ठेवली, तुमचे उपकार कृतज्ञतेने स्मरले, व्यथा आणि वियोग त्यांनी समर्पकपणे व्यक्त केला. पण स्वामीजी, तुम्ही ज्या मराठवाड्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी संपूर्ण हयात वेचली, खेड्यापाड्यातून हिंडला, अठरापगड जातीतून शिक्षणासाठी मुले गोळा केली, शाळा-कॉलेजे काढली, गरीब-कष्टकरी जनतेसाठी तुम्ही स्वातंत्र्यात लोकशाहीचा आणि आर्थिक समतेचा आशय स्पष्ट करण्यासाठी हितसंबंधी शत्रूशी लढलात त्या मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात तुमची फारशी दखल कोणी घेतली नाही, तुम्हाला जाणणाऱ्यानी थोडी हळहळ, शोकसभा, हरताळ असे सोपस्कार काही ठिकाणी झाले हे खरे, पण तुमच्या कष्टातून, त्यागातून जे स्वातंत्र्य आले, जो महाराष्ट्र निर्माण झाला, तेथील सत्ता उपभोगणाऱ्या, तुम्हाला शेवटपर्यंत प्रिय असणाऱ्या मंत्री, पक्ष आणि नेत्यांनी तोंडावरची माशी झटकून टाकावी एव्हढी देखील आस्था तुमच्याविषयी दाखवली नाही. तुम्हाला याच्याशी कर्तव्य नाही, जिवंत असताना तुम्ही हाल सोसले, वनवास भोगला, काही मागितले नाही, ते तुम्ही मरणोत्तर कसले मागणार? तुमचे ठिकच आहे. प्रश्न आमच्या कृतज्ञता, बुद्धीचा आणि सभ्यतेचा आहे.”
अगदी असेच आजही स्वामीजी आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षात लढ्याची जी उपेक्षा होतेय त्याविषयी म्हणावे लागेल. आणि सर्वच पक्षांना स्वामीजींच्या पुतळ्यात रस नाही, ना मुक्तीसंग्रामाचा धगधगता इतिहास, वारसा नव्या पिढीपर्यंत नेण्याचे धाडस. त्यामुळे स्वामीजींच्या पुतळ्याविषयी कोणी कितीही प्रयत्न करो, SRTI मार्फत सारंग टाकळकर, Sarang Takalkar डॉ. रश्मी बोरीकर, Rashmi Borikar डॉ शिरीष खेडगिकर Shirish Khedgikar यांनी स्थानिक प्रशासनाला पत्र देऊ द्यात,पाठपुरावा करू द्यात, केंद्रीय मंत्री भागवत कराड Bhagwat Karad, राज्याचे मंत्री अतुल सावे Atul Save, यांनी परभणीचे ऍड. जी. आर. देशमुख यांना आश्वासने देऊ द्यात, किंवा मराठवाडा इंडस्ट्री असोसिएशन तर्फे रामभाऊ भोगले Ram Bhogle यांनी क्रांती चौकाचे सुशोभीकरण करून, स्वामीजींच्या पुतळ्यासाठी चौथरा राखून ठेवला, खूप प्रयत्न केले त्यांनी! पण तरीही पुतळा उभारला जाणे अवघडच आहे!
कारण उपेक्षा सहन करण्याची परंपरा आणि मराठवाड्याच्या जनतेचे महाराष्ट्र प्रेम..!
अलिकडेच औरंगाबाद-जालना जि. प. चे माजी मुख्याधिकारी, मंत्रालयातील शिस्तप्रिय सिनियर सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी Anand Kulkarni यांनी मुक्तीसंग्राम विषयक व्हिडीओ पाहिला आणि फोनवरून विचारणा केली की सरकार काही करतेय का अमृत महोत्सवासाठी? आणि स्वामीजींच्या पुतळ्यासाठी लागणारे चार-पाच लाख रुपये प्रशासन-शासन तरतूद कशी काय नाही करू शकत? मी निवृत्त असलो तरी मी करतो पाठपुरावा! मला पाठवा डिटेल्स! Sarang Takalkar मार्फत पाठवले आम्ही डिटेल्स!आनंद कुलकर्णी म्हणजे झपाटलेला आणि जिथे काम केलंय तेथील इतिहास जाणणारा अधिकारी! त्यांनी आता स्थानिक सनदी अधिकाऱ्यांशी बोलणे केलेय, मंत्रालयातही ते स्वतःहून पाठपुरावा करत आहेत.
मी निराश नाही कारण 16 सप्टेंबर 2022 पासून ते आजवर मुक्तीसंग्राम समजून सांगणारी 41 भाषणे मराठवाड्यात, नाशिक भागात मी केली, ती विद्यापीठे आणि कॉलेजच्या मदतीने. सरकार उदासीनच दिसले आणि आहे. गम्मत म्हणजे हा विषय म्हणे सांस्कृतिक मंत्रालयाचा आहे आणि त्यांनी 10 डझन सदस्यांची एक जम्बो समिती नेमून टाकली, आमच्यासकट! पण समितीने काहीच केले नाही, आणि आता तर भारतीय स्वातंत्र्याला पूर्णत्व देणाऱ्या हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे अमृत महोस्तवी संपायला उणे- पुरे फक्त 20 दिवस राहिलेत. मग कशाला अपेक्षा करायची? पण अंबेजोगाईचे योगेश्वरी महाविद्यालय, नांदेडचे माहिती कार्यालय, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, आणि SRT संशोधन संस्था यांनी आपली जाण दाखवली हे उल्लेखनीय ठरावे.
#sorryswamiji