मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ४० आमदारांना अपात्रेसंदर्भात उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या आमदारांना उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवली होती. या संदर्भात शिंदे गटाच्या आमदारांनी आणखी मुदत देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुदत वाढ देण्याचा हा निर्णय घेतला आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचे अधिकार अबाधित ठेवत, या संदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व आमदारांना नोटीस पाठवत आपले म्हणणे मांडण्यासाठी सांगितले. आता राहुल नार्वेकर यांनी दोन आठवड्याची मुदतवाढ दिली.
ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेत नाहीत, हे पाहून उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा धाव घेतली. या संदर्भातला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घ्यावा किंवा राहुल नार्वेकर यांना तात्काळ निर्णय घेण्यासाठी निर्देश द्यावे अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. मात्र, या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अद्याप कोणताच निर्णय दिलेला नाही.