छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) च्या सिडको वाळूज महानगर-१ परिसरात मागील सहा दिवसांत पिसाळलेल्या कुत्र्याने ७ जणांवर हल्ला केला. हा कुत्रा समोर दिसेल त्याचा चावा घेत हाेता. या कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमींवर घाटीत उपचार सुरु आहेत.
नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर कुत्र्याला पकडण्यासाठी आलेल्या पथकाने परिसरातील दुसरेच कुत्रे पकडून कागदोपत्री कारवाई केली. मात्र, अजूनही खरा हल्लेखोर पिसाळलेला काळ्या-पांढऱ्या रंगाचा कुत्रा मोकाट फिरत असल्याने लहान मुले, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
सिडको प्रशासनाने मंगळवारी मनपाच्या श्वानपथकाला बोलावून कारवाई केली, तथापि, ही सुरू राहणार असल्याचे सिडकोच्या वसाहत अधिकारी अस्मिता विरशीद यांनी सांगितले.
हात-पायांना घेतला चावा
११ जुलै रोजी मच्छिंद्र कुंभार पहाटे वॉकिंगला गेले. तेव्हा खिंवसरा पार्क परिसरात कुत्र्याने त्यांच्या हाताला चावा घेतला. त्यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी त्या कुत्र्याने अन्य दोघांवर तर दुपारी पुन्हा एकावर हल्ला केला. त्याच कुत्र्याने २४ जुलै रोजी पहाटे जिजाऊ चौकात मंजिरा सोनी यांच्या पायाला चावा घेतला. तर सायंकाळी तिसगाव चौकातून पायी जाणाऱ्या रघुवीर बनसोडे, सचिन पाटील यांच्यावर हल्ला केला.
मटण विक्रीमुळे मोकाट कुत्रे वाढले
सिडकोत अनधिकृत मटण विक्रीची दुकाने वाढली आहेत. मटण शॉप, चहाच्या टपऱ्या, हॉटेल तसेच उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे या परिसरात माेकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली. प्रशासनाने अनधिकृत मटण विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सिडको बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे व रहिवाशांनी केली.