सायकल चालवताना आकस्मिकरित्या एक भीषण अपघात होतो. त्यात एका १२ वर्षीय मुलाचे शीर धडावेगळे होते. आणि, तेच शीर पुन्हा धडाला जोडून त्या मुलाचा प्राण वाचवला जातो. एक चमत्कार वाटावी, अशीच हि घटना आहे. हा चमत्कार इस्राईलमध्ये डॉक्टरांनी घडवला.
सुलेमान हसन (वय १२) या पॅलेस्टिनी मुलाबाबत ही घटना इस्राईलमध्ये घडली. सायकल चालवताना एका कारने धडक दिली, आणि त्याचे शीर धडापासून जवळपास वेगळे झाले, केवळ त्वचा आणि काही नसांच्या माध्यमातून ते चिकटून होते. मात्र, द टाइम्स ऑफ इस्राईलने मणक्यासह त्याचे मज्जारज्जू देखील वेगळे झाले होते, अशी माहिती दिली आहे.
सुलेमान हसनची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्याला एअर अँब्युलन्सने हादासाह मेडिकल सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर आर्थोपिडिक डॉक्टर ओहद इनाव यांनी ही खूपच गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. यासाठी त्यांना अनेक तास लागले.
या दुर्मिळ घटनेत केवळ त्वचेमुळे सुलेमानचे शीर चिकटून होते. पण आम्ही सर्व कौशल्य पणाला लावले. त्याचे डोके आणि धड यांना जोडून ठेवण्यासाठी अगोदर धातुच्या प्लेट्स लावण्यात आल्या आणि नंतर शस्त्रक्रिया केली. आता त्याची प्रकृती सुधारली असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे डॉक्टर ओहद इनाव यांनी सांगितले.