विश्लेषण / श्रीपाद सबनीस
राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या फाटाफुटीनंतर येवल्यात ८ जुलैला पहिलीच सभा झाली, त्यात शरद पवार यांनी सगळ्यांची माफी मागितली. अर्थातच ही माफी म्हणजे एक दुधारी अस्रच. या माध्यमातून त्यांनी दुखावलेल्या लोकांवर जशी आपुलकीची पखरण केली. तसेच दुरावलेल्याना इशाराही दिला. आता स्वतः शरद पवार पक्ष बांधणीच्या कामात पुन्हा व्यस्त झाले आहेत. आज (दि. १२ जुलै) त्र्यंबकेश्वरात याच अनुषंगाने महत्वाची बैठक सुरु आहे.
एक मात्र खरे कि, येवल्यातील सभेच्या अनुषंगाने राजकीय निरीक्षकांनी जे-जे काही आडाखे बांधले, ते सारे साफ चुकले. तसे शरद पवार यांचेही अंदाज फारसे चुकत नाहीत. मात्र माझा अंदाज यावेळी चुकला म्हणूनच माफी मागण्यासाठी इथे आल्याचं सांगताच कार्यकर्त्यांमध्ये ‘फिनिक्स’चं बळ संचारलं. हे प्रसंग पाहताना मला आंध्र प्रदेशच्या जगनमोहनचा राजकीय संघर्ष आठवला.
वायएसआर रेड्डी यांच्या पश्चात आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री कोण, असा प्रश्न पुढे आला होता. मात्र काँग्रेसने जगनमोहन रेड्डीला जाणीवपूर्वक मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवले होते. ३८ वर्षांचा जगनमोहन राज्यभर फिरत राहिला. वडीलांचे निधन झालेले. पक्ष सोडलेला. पद आणि चिन्ह सोडलेलं अशी एकंदर परिस्थिती. परंतु २०११ मध्ये जगनमोहनने ‘वायएसआर कॉंग्रेस’ ची स्थापना केली. पोटनिवडणुकीत तो आणि त्याची आई दोघेही विजयी झाले. काँग्रेसने तपास यंत्रणांचे शुक्लकाष्ठ मागे लावले, त्यास अटक झाली. परंतु हे त्याच्या पथ्यावर पडले, तो लोक नायक ठरला.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्याच्या झंझावाताने चित्र बदलले. त्याला सत्ता मिळाली नाही. तेलुगु देसम सत्तेवर आली. चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री झाले. जगनमोहन विरोधी पक्षनेता झाला. सभागृहात आणि बाहेरही तो आंध्र प्रदेशच्या जनतेचा आवाज झाला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहनने १७५ पैकी १५७ जागा मिळवल्या. सगळ्यांना जमीनदोस्त करून अखेर तो मुख्यमंत्री झाला.
तात्पर्य असे कि, जर जनता सोबत असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आता या इतिहासापासून कोण आणि काय बोध घेतो, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र आगामी निवडणूक कोणाही पक्ष, आणि उमेदवाराला वाटते तितकी सोपी नाही. तूर्त इतकेच.