khabarbat

Advertisement

हिकमती फडणवीस, पॉवरबाज पवार !

विश्लेषण / श्रीपाद सबनीस
SHRIPAD SABNIS

खरंच, काही योगायोग अतिशय विलक्षण असतात. उल्लेखनीय म्हणजे शिवसेना – भाजप युतीची सांगता ही ‘युती’च्या रौप्यमहोत्सवी वर्षांतच झाली. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसने रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले तोच पक्षात फूट पडली. अर्थातच ही फूट आहे, का बंड कि सगळाच बनाव होता, हे येणारा काळ सांगेल.

पण यामागे दोन शक्यता असू शकतात. एक म्हणजे उद्धव ठाकरे यांचे घोंगडे झटकणे, कार्यकर्त्यांची काँग्रेस सोबत होत असलेली फरफट रोखणे, आणि दुसरी म्हणजे बदलत्या राजकीय पर्यावरणाचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्य प्रवाहात आणणे, पक्ष मजबूत करणे आणि त्याचा विस्तार करणे हे शरद पवार यांना अधिक महत्वाचे वाटले असावे. आणि त्यात गैर असे काय? म्हणूनच कदाचित शरद पवार यांचाच हा पॉवर प्ले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कारण मे महिन्याच्या प्रारंभी शरद पवार यांनी दिलेल्या आणि मागे घेतलेल्या राजीनाम्यापासून भाजपसाठी पोषक पार्श्वभूमी राष्ट्रवादी काँग्रेसनेच तयार करून दिली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करून अजित पवार यांना आव्हान दिले गेले.

आता खरी अडचण झाली ती एकनाथ शिंदे यांच्यावरील विश्वासाने आणि अजित पवार यांच्यावरील नाराजीने शिवसेना सोडून आलेल्यांची. म्हणजे एवढा अट्टाहास करून हाती काय लागले, हा प्रश्न या सर्वासमोर आहे. परंतु दोन पक्षांतरांमुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचे उत्तर तिसरे अथवा प्रति-पक्षांतर असणारच नाही, असेही नाही.

लोकसभेच्या आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या ‘शिवसेने’ला सोबत घेऊन महाराष्ट्रातून ४० – ४५ जागा जिंकणे भाजपला तसेही अशक्य होते. म्हणूनच हिकमतगार देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एका बलदंड मित्राचा शोध सुरु केला. त्यांच्या समोर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय होता, तूर्त अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पर्यंत येऊन तो शोध थांबला, असे म्हणता येईल.

मात्र, हा शोध पूर्ण करताना देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ ‘राष्ट्रवादी’चेही कंबरडे मोडले, असे राजकीय निरीक्षक म्हणत असले तरी भाजपच्या डावपेचापेक्षाही शिवसेना असो कि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या शिर्षस्थ नेत्यांनी दुसऱ्या फळीची केलेली हेटाळणी अधिक फलद्रुप ठरली. सेकंड लाईनच्या leadership management मध्ये हे नेते आजच्या वर्तमानात सपशेल फेल ठरले, आणि हे नाकारता येत नाही.

अर्थातच शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणातील पॉवरबाज नेते आहेत. तूर्त तरी जनतेत जाऊनच लढाई लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले याचाच अर्थ भविष्यातील अनेक शक्यतांची दारे खुली असल्याचा संकेत त्यांनी दिला आणि तो देताना त्यांनी हात राखून ठेवलेला नाही. हे उल्लेखनीय ठरावे.

मात्र ज्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने महाविकास आघाडी स्थापन झाली, तिचे नेमके भवितव्य काय, असाही प्रश्न या पॉवर प्ले मुळे निर्माण झाला आहे.

मात्र नव्या समीकरणांमुळे लोकसभेच्या आगामी निवडणुकांबद्दल अनेक शक्यता खुणावू लागल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील मतदारसंघांवर एवीतेवी राष्ट्रवादीचा प्रभाव आहे. मावळ, जुन्नर, खेड-आळंदी, दौंड, इंदापूर, शिरूर या मतदारसंघात सत्तेची फेरमांडणी भाजप आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसमोर अडचणी वाढवणार, हे नक्की.

बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यात विशेष लक्ष दिले गेले. या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचे खासदार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे बारामतीची विशेष जबाबदारी आहे.

नव्या बदलामुळे सुप्रिया सुळेंवर राजकीय दबाव येण्याची जशी शक्यता नाकारता येत नाही. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये सध्याच्या भाजप नेत्यांची मक्तेदारी चालणार नाही. चिंचवड, भोसरीमध्ये प्रस्थापितांना विरोध ही देखील भाजपसाठी जमेची बाजू ठरणार नाही.

सडेतोड विश्लेषण फक्त khabarbat.com वाचत राहा : कॉल 9960542605

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »