अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या शिक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या एशिया सोसायटी (एएस) आणि इंडियन अमेरिकन इम्पॅक्ट (आयएआय) यांच्याशी संबंधित १०० हून अधिक लोकप्रतिनिधींनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडे यासंदर्भात प्रस्ताव सादर केला. यामध्ये ८१६ कोटी रुपयांच्या निधीतून १,००० शाळांमध्ये हिंदीचा अभ्यास वर्ग सुरू होणार आहे.
बायडेन यांचा भारताबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन विचारात घेता हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी सप्टेंबरपासून हिंदी भाषेचे शिक्षण सुरू होऊ शकते.
प्राथमिक वर्गापासून सुरू होणाऱ्या हिंदीच्या शिक्षणात इंग्रजीनंतर दुसरी भाषा म्हणून हिंदी निवडण्याचा पर्याय असेल. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या सुमारे ४५ लाख लोकांपैकी ९ लाखांहून अधिक लोकांद्वारे हिंदी ही सर्वाधिक बोलली जाणारी भारतीय भाषा आहे.
हायस्कूलमध्ये हिंदी
सध्या अमेरिकेत हायस्कूल स्तरावर हिंदीचे अभ्यासक्रम चालवले जात आहेत. यामध्ये फक्त हिंदीचा प्राथमिक अभ्यास शिकवला जातो. इंडिया इम्पॅक्टचे अध्यक्ष नील मखिजा याविषयी माहिती देताना म्हणाले की, सध्या मुलांना सुरुवातीच्या वर्गापासून हिंदी शिकवली जात नाही, अचानक हायस्कूल स्तरावर हिंदी भाषेचा पर्याय येतो, त्यामुळे ती भाषा अजिबात समजत नाही. आता मुलांना प्राथमिक वर्गापासून हिंदी सुरू करण्याचा लाभ मिळणार आहे.
भारत तिसरी सर्वात मोठी शक्ती
अमेरिकेमधील बहुतेक शाळांमध्ये स्पॅनिश ही दुसरी भाषा म्हणून शिकवली जाते. पण आता परिस्थिती बदलत आहे. या दशकाच्या अखेरीस भारत तिसरी आर्थिक शक्ती बनेल. अशा परिस्थितीत भारताची उत्तम जाण असलेल्या हिंदीचा अभ्यास करून पिढी शाळांमधून बाहेर पडावी, हे अमेरिकेचे ध्येय असले पाहिजे. कारण भारतात कृषी, तंत्रज्ञान तसेच अन्य क्षेत्रात रोजगार संधी येत्या काही वर्षांत वाढणार आहेत.
४ राज्यांमध्ये १० शाळा
अमेरिकेतील न्यू जर्सी, टेक्सास, न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्निया या भारतीय बहुल ४ राज्यांमध्ये हिंदी शिकवणाऱ्या सुमारे १० शाळा आहेत. न्यू जर्सीमध्ये अशीच एक शाळा चालवणारे बिशेन अग्रवाल म्हणतात की ५ ते १६ वयोगटातील मुलांना शनिवारी हिंदी शिकवली जाते. अभ्यासक्रमाचे तीन टप्पे ठरविण्यात आले आहेत – नवशिके, माध्यमिक आणि उच्च स्तर. २० वर्षांपूर्वीपर्यंत अमेरिकेत हिंदी शिकवणारी शाळा नव्हती. हिंदी शाळांमध्ये मुलांची पटसंख्याही वाढली आहे.