बालाघाट, भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आढळणाऱ्या सारस पक्ष्यांचे अस्तित्त्व न्यायालयाच्या सुचनेनंतरही धोक्यात आले आहे. सेवा संस्था आणि वनविभागाने जून महिन्यात केलेल्या गणनेत महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया जिल्ह्यात ३५ आणि लगतच्या बालाघाट जिल्ह्यात फक्त ४९ सारस पक्ष्यांची नोंद झाली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत या पक्ष्यांच्या संख्येत २ ने घट झाली आहे. विशेष म्हणजे, घरट्यांच्या संख्येतही गोंदिया जिल्ह्यात सातत्याने घट होताना दिसून येत आहे. सारस संर्वधनासाठी वन्यजीव संस्था आणि वन विभागाने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
गेल्या तीन वर्षाचा विचार केल्यास सातत्याने सारस पक्ष्यांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. जूनमध्ये करण्यात आलेल्या सारस गणनेनुसार महाराष्ट्रात ३५ तर मध्यप्रदेशात ४९ सारस पक्षी आढळले. मागील वर्षीच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यात ३ सारस कमी झाले तर भंडारा जिल्ह्यात १ व मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात ४ सारसांची संख्या वाढली आहे. गोंदिया जिल्ह्यात सारस संख्या कमी होणं चिंतेची बाब ठरली आहे. सारस बचावाकरीता न्यायालयाने निर्देश दिल्यानंतरही मागील वर्षीच्या तुलनेत सारस पक्ष्यांची कमी झालेली संख्या प्रशासनाच्या नियोजनातील अभाव दर्शवणारी ठरली आहे.