१) केळी लागवड गादी (बेड) पद्धतीने करावी
२) ठिबक सिंचनच्या दोन नळ्यांचा वापर हवा
३) पूर्ण वाढलेल्या फळाचे संरक्षण गरजेचे
जळगाव जिल्हा केळी उत्पादनाची ‘राजधानी’ आहे. ‘गुगल’ने सुद्धा ‘जीआय मानांकन’ देत ‘जळगावची केळी’ ही ओळख मान्य केली आहे. खान्देशातील बहुतेक शेतकऱ्यांनी केळीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला आहे. इतर राज्यातील शेतकऱ्यांच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यातील शेतकरी केळीचे प्रती हेक्टर सरासरी ७५ मेट्रीक टन उत्पादन घेत आहे.
एका घडाचे वजन सरासरी २५ किलो वा त्यापेक्षा जास्त असते. अशाही स्थितीत केळी लागवड, पाणी व खते देणे, फळांचे पोषण व संरक्षण या विषयी काही नवी तंत्रे शेतकऱ्यांनी स्वीकारणे आवश्यक आहे. या संदर्भात जैन उद्योग समुहातील जैन कृषितंत्र आणि विकास केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आयोजित शिवार भेट आणि पीक पाहणी कार्यक्रम केळी लागवडीची अद्ययावत माहिती मिळते आणि प्रात्यक्षिके सुद्धा पाहता येतात.
गेल्या २५-३० वर्षांत केळी लागवडीच्या पद्धतीत सतत बदल होत आले. ऊती संवंर्धित रोपांची लागवड, ठिबक सिंचन पद्धतीतून पाण्याचा वापर आणि त्यासोबत विद्राव्य खतांचा वापर शेतकरी करीत आहेत. केळी लागवडीत सध्या ‘ग्रॅण्ड नाईन’ या वाणाला सातत्याने मागणी आहे. लागवडीच्या आकारानुसार प्रती एकरी १,२१० ते १,४५२ रोपे लावली जातात. गादी पद्धतीमुळे पाण्याचा निचरा वेळीच होऊन केळीची मूळे नीटपणे विस्तारतात.
केळीसाठी आता ठिबक सिंचनच्या एक नळी ऐवजी दोन नळ्यांची शिफारस कृषितज्ज्ञ करीत आहेत. या मागील कारण हेच की, केळी झाडाची मूळे चारही बाजूला विस्तारतात. केवळ एका बाजूला नळी असेल तर पाणी व खते देण्याचा कालावधी वाढतो. त्यामुळे मुळांची वाढ असमान होण्याची शक्यता असते. दोन्ही बाजूला पुरेसे पाणी व खते मिळाली की खोडाची वाढ जोमाने होऊन फळधारणा वेळवर होते.
केळी घड निघण्याच्या अवस्थेत आली की त्याला बड इंजेक्शन दिले जाते. घड खाली येऊ लागले की त्यासाठी बुरशी व इतर कीड नाशके फवारली जातात. घडाला संरक्षक बॅग लावली जाते. हे काम करीत असताना ‘गोल्डन केळी’ उत्पादनाची काळजी घ्यावी लागते. जेव्हा घडाला संरक्षक बॅग लावतात तेव्हा केळी फळाच्या खालच्या बाजूला काळे फूल आलेले दिसते. या फुलाची पाने तोडून टाकावी लागतात. अलिकडे स्थानिक बाजारातही ग्राहक विना डागांची केळी मागत असतो. ही बाब लक्षात घेऊ केळी फुलांची काढणी वेळेवर करायला हवी.
इलाखी, पू वन, नेंद्रन, मोंथन, रेड बनाना यांनाही शेतकऱ्यांची पसंती आहे. जैन कृषितंत्र आणि विकास केंद्राने केळीच्या ३४ जातींची खुल्या शिवारात लागवड केलेली आहे. त्यांच्यासाठी पूरक व पोषक वातावरण कोणते ? याचा अभ्यास कृषितज्ज्ञ करीत आहेत.
@दिलीप तिवारी, जळगाव
@dilipktiwarijalgaon