परभणी : राज्यात बारावीच्या परीक्षांना मंगळवारी सुरूवात झाली. राज्यात १४ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. कॉपीमुक्त परीक्षांसाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असतानाच इंग्रजी या विषयाचा पेपर फोडणाऱ्या ६ शिक्षकांना परभणीत अटक करण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार केली. सोनपेठ पोलिसांनी हा प्रकार उघड केला.
या प्रकरणी पोलिसांनी उपकेंद्र संचालक कालिदास कुलकर्णी, इंग्रजी शिक्षक बालाजी बुलबुले यांच्यासोबत जिजामाता विद्यालयाचे शिक्षक गणेश जयतपाल, शिक्षक रमेश मारोती शिंदे, शिक्षक सिद्धार्थ सोनाळे, शिक्षक भास्कर तिरमले या सहा जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.
या शिक्षकांवर महाराष्ट्र विद्यापीठ, मंडळाच्या व इतर विधिनिष्ठ परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकार प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८२ कलम ५,७,८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून राज्यभरात कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवले जात आहे. त्यामुळे शिक्षकांनीच इंग्रजीचा बोर्डाचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.