औरंगाबाद : बहुप्रतीक्षित असलेल्या उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतराबद्दल केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी महत्वाची माहिती दिली. उस्मानाबादचे धाराशिव करण्यास हरकत नाही, अशी माहिती केंद्र सरकारने हायकोर्टात दिली आहे. मात्र औरंगाबादचे नाव छत्रपची संभाजीनगर करण्याची प्रक्रीया विचाराधिन असल्याचे म्हटले.
एकंदरीत औरंगाबादचे नामांतर वेटिंगवर असल्याचे समोर आले. उस्मानाबाद आणि औरंगाबादचे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारकडून ही महत्वाची माहिती देण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे आधी ठाकरे सरकारने आणि नंतर शिंदे – भाजप सरकारने दोन्ही शहरांच्या नामांतराचा निर्णय घेतला होता.
१ हजार कोटींचा भुर्दंड
शहराचे नाव बदलल्याचा सामान्यांच्या जीवनावर काहीही परिणाम होत नाही. मात्र शासन स्तरावर नाम बदलाच्या प्रक्रियेने मोठा खर्च उभा राहतो. आणि हा खर्च करदात्यांच्याच पैशांतून होत असतो. त्यामुळे नाम बदलाची प्रक्रिया तशी पाहिल्यास सामान्यांसाठी तोट्याचीच ठरते. साधारणपणे एखाद्या शहराचे नाव बदलण्यासाठी सरासरी ३०० कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो, जर शहर मोठे असेल तर ही रक्कम १ हजार कोटींपर्यंत पोहोचू शकतो.
भाजपावर टीकास्र
महाविकास आघाडी सरकार असताना भाजपाचे नेते ‘हिंमत असेल तर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करून दाखवा’, असे म्हणत होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता हा प्रस्ताव केंद्र सरकारने रखडून ठेवला आहे. भाजपा आता त्यावर भूमिका घ्यायला तयार नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
३,६२६ गावे रामाच्या नावावर
२०११ च्या जनगणनेनुसार देशातील एकूण गावांची संख्या ६,७७,४५९ आहे.
त्यापैकी ३,६२६ गावांची नावे रामाच्या नावावरून आहेत.
३,३०९ गावांची नावे भगवान कृष्णाच्या नावाशी जोडलेली आहेत.
२३४ गावांची नावे मुघल सम्राट अकबराच्या नावावरून आहेत.
बाबरच्या नावावरून ६२, हुमायूनच्या नावावरून ३० आणि शाहजहानच्या नावावरून ५१ गावांना नावे देण्यात आली आहेत.
८ गावांना औरंगजेबाचे नाव आहे आणि ती सर्व यूपीच्या बिजनौरमध्ये आहेत.
नामांतरात आंध्रप्रदेश आघाडीवर
आंध्र प्रदेशात सर्वाधिक ७६ ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. तमिळनाडूने ३१ तर केरळने २६ ठिकाणांचे नाव बदलले आहे. महाराष्ट्रानेही १८ ठिकाणांची नावे बदलली आहेत. उत्तर प्रदेशमध्ये स्वातंत्र्यानंतर केवळ ८ शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. स्वातंत्र्यानंतर देशातील ९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांची नावेही बदलण्यात आली आहेत.