- देशभरातील १२५ कृषी शास्त्रज्ञ – संशोधक सहभागी
- ८५ वेगवेगळ्या वाणांची प्रात्यक्षिके तयार
शेतकऱ्याना पैसा, सन्मान मिळाला पाहिजे
जैन उद्योग समुहाने विकसीत केलेली कृषी विषयक विविध नवी तंत्रे आणि पीक प्रात्यक्षिक शिवार पाहणीसाठी राज्यातील शेतकऱ्यांचे दौरे सुरू असताना ‘गांंधीतिर्थ’ मधील कस्तुरबा सभागृहात कांदा, लसूण पिकांशी संबंधित तीन दिवसांचा तिसरा राष्ट्रीय परिसंवाद आज (शनिवारी) सुरू झाला.
‘कांदा, लसूण यांचे शाश्वत उत्पादन आणि मूल्य साखळी व्यवस्थापनातील अद्ययावत तंत्रज्ञान’ हा या परिसंवादाचा विषय आहे. या परिसंवादात देशभरातील १२५ वर कृषी शास्त्रज्ञ व संशोधक सहभागी आहेत. यानिमित्ताने ‘जैन’ च्या कांदा संशोधन विभागाने ८५ वेगवेगळ्या वाणांची प्रात्यक्षिके तयार केलेली आहेत. त्याचीही पाहणी परिसंवादात सहभागी अभ्यासक करणार आहेत.
या परिसंवादाचे आयोजन भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR, इंडियन सोसायटी ऑफ ऐलियम ISA, कांदा आणि लसूण संशोधन संचालक DOGR आणि जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड JISL आहेत.
या परिषदेत कांदा, लसूणच्या नव्या जाती, लागवड पद्धती, नवतंत्र, उत्पादन वाढ, साठवणूक, बाजारपेठ, बाजारभाव, प्रक्रिया आणि खर्च वजा जाता नफा या विषयावर सलग चर्चा व अभ्यासलेखांचे सादरीकरण होणार आहे.
परिसंवादाच्या उद्घाटन सत्रात ISA चे अध्यक्ष डाॅ. के. इ. लवंडे, डाॅ. एच. पी. सिंग, डाॅ. एस. एन. पुरी, ASRB-DARE चे डाॅ. मेजर सिंग, ICAR चे डाॅ. सुधाकर पांडे, डाॅ. ए. जे. गुप्ता आणि JISL चे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी विचार मांडले. कांदा उत्पादन जरी समाधानकारक असले तरी ते वाढायला हवे असे मत मांडण्यात आले.
यावेळी अनिल जैन यांनी जैन उद्योग समुह कांदा पिकाविषयी उत्पादनाचे वाण, चव, नवे तंत्र, उत्पादन वाढ, शेतकऱ्यांना मदत, मार्गदर्शन, कांदा खरेदी यासाठी करार शेती (Contact Farming) करीत असल्याची सविस्तर माहिती दिली. अनिल जैन म्हणाले, शेतकऱ्यांना सन्मान व पैसा दोन्ही मिळायला हवे. शेतकऱ्याच्या मुलांनी अभिमानाने सांगायला हवे, हो मी शेतकरी पुत्र आहे. तशी स्थिती निर्माण करायला अजूनही संशोधनाचे काम व्हायला हवे.’
अनिल जैन यांनी अपेक्षा व्यक्त केली की, ‘शेतातील पिकांना कमी पाणी वापरले जावे, उत्पादन वाढावे पण ते गुणवत्तापूर्ण हवे. नवे संशोधन करताना जमिनीचा पोत खराब होणार नाही. त्याची पुनर्स्थापना करता येईल, असे संशोधन सतत व्हायला हवे.
जैन उद्योग समुहातील ‘फार्म फ्रेश’तर्फे विक्रमी कांदा उत्पादकांचा स्व. सौ. कांताबाई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्काराने गौरव करण्यात आला. ही परिषद अजून दोन दिवस चालणार आहे …
आमचा धर्म शेती …
अनिल जैन यांनी भावनिक किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘आम्ही जैन धर्मीय आहोत. भोजनात कांदा-लसूण वापरत नाही. पण सर्वांत मोठा कांदा निर्जलीकरण प्रकल्प आमचा आहे. आमचे पिताश्री श्रद्धेय भवरलालजी यांना याबाबत कोणी तरी प्रश्न विचारला, तुम्ही जैन आहात, कांदा खात नाही. मग कांदा पिकावर काम का करता ? तेव्हा वडील म्हणाले, ‘मी जैन असण्याच्या अगोदर शेतकरी आहे. शेती माझा धर्म आहे. माझ्या शेतकरी धर्माला जागून आम्ही शेतीशी संबंधित काम करीत आहोत. त्यात आम्हाला अभिमान आहे.’
Ⓒ दिलीप तिवारी, जळगाव
🅕 dilipktiwarijalgaon
तुमच्या उपयोगाची बातमी, khabarbat.com