मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन – २०२३ जिंकून नोव्हाक जोकोविचने इतिहास रचला. त्याने विक्रमी १० व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन २०२३ जिंकली. पुरुष एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत त्याने ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपासचा ६-३, ७-६, ७-६ असा पराभव केला. जोकोविचने २२वे ग्रँडस्लॅम जिंकले आणि यासोबत राफेल नदालची बरोबरी केली.
पुरुष एकेरीच्या विजेतेपदाचा सामना नोव्हाक जोकोविच आणि स्टेफानोस त्सित्सिपास यांच्यात खेळला गेला. अंतिम सामन्यात जोकोविचने शानदार सुरुवात करत पहिला सेट ६-३ अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जोरदार झुंज दिली, पण शेवटी जोकोविचने ७-६ अशा फरकाने विजय मिळवला. तिसर्या सेटमध्येही त्सित्सिपासने पुनरागमन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु जोकोविचवर मात करू शकला नाही. या विजयासह तो एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला.
ऑस्ट्रेलियन ओपन १० व्यांदा जिंकणारा जोकोविच
जोकोविचने १० व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल खेळली. याआधी जोकोविचने नऊ वेळा या ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती आणि प्रत्येक वेळी विजेतेपद पटकावले. जोकोविचने २००८, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१६, २०१९, २०२० आणि २०२१ मध्ये विजेतेपद पटकावले होते. २०२२ मध्ये जोकोविच व्हिसाच्या कारणांमुळे ही स्पर्धा खेळू शकला नव्हता. त्यावेळस राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकले होते.