उद्योगपती अदानींवरील पंतप्रधान मोदींच्या प्रेमामुळे अर्थव्यवस्थेसमोर गंभीर संकट

अदानी कंपनीच्या कारभाराची सेबी, SIT आणि रिझर्व्ह बँकेकडून सखोल चौकशीची मागणी
मुंबई : हिंडनबर्ग संशोधन संस्थेने अदानी समुहातील आर्थिक गैरव्यवहार उघड केल्याने या समुहातील मोठ्या गुंतवणुकीचा फुगा फुटला आहे. अदानी समुहातील हेराफेरी उघड झाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया व एलआयसीमध्ये गरिब, मध्यमवर्गीय व कष्टकरी लोकांनी केलेली गुंतवणूक धोक्यात आली आहे.
अदानी समूहातील गैरव्यवहार ही सामान्य घटना नसून उद्योगपती गौतम अदानी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घनिष्ठ संबंध पाहता सेबी व रिझर्व्ह बँकेने या हेराफेरीची गंभीरपणे चौकशी केली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
सामान्य गुंतणूकदार संकटात
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी अदानी समुहाला खाजगी बँकांपेक्षा दुप्पट कर्ज दिले. एकट्या स्टेट बँक ऑफ इंडियाने अदानी कंपनीला ४०% कर्ज दिले. LIC ने ८ टक्के शेअर्स म्हणजेच तब्बल ७४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये केली. या अंधाधुंद व बेजबाबदार गुंतवणुकीमुळे LIC आणि SBI मध्ये बचत केलेल्या करोडो सामान्य गुंतवणुकदारांसमोर गंभीर आर्थिक धोका निर्माण झाला आहे.
कोट्यवधी रुपये डुबण्याची भीती
स्टेट बँक ऑफ इंडिया, एलआयसीसह सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील सामान्य जनतेचा पैसा मोदींनी आपल्या उद्योगपती मित्राच्या विविध कंपन्यांमध्ये कोणताही विचार न करता गुंतवला. अदानी कंपनीवर केलेल्या मेहरबानीमुळे कोट्यवधी रुपये डुबण्याची भिती निर्माण झाली असून या गैरव्यवहाराची संपूर्ण चौकशी स्वतंत्र एसआयटीमार्फत करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
अदानीचा फुगा फुटला; शेअर कोसळले
अदानी कंपनीत मोठे गौडबंगाल आहे हे उघड होताच या कंपन्यातील शेअर कोसळले व एसबीआय, ‘एलआयसी’सह सरकारी कंपन्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला. अदानीचा फुगा आज फुटला आहे. सहारा कंपनीच्या सुब्रत रॉयचा सुद्धा असाच बोलबाला होता पण सहाराचा फुगा फुटला आणि सुब्रत रॉयला जेलची हवा खावी लागली. करोडो लोकांचे पैसेही बुडाले.
धारावीतील लाखो गरीब संकटात
मुंबईचा हा विमानतळ अदानीच्या घशात घालण्यासाठी मोदी सरकारने सरकारी तपास यंत्रणांचा कसा गैरवापर केला हे सर्वांना माहित आहे. मुंबईतील वीज वितरणही अदानीला देण्याचा घाट राज्यातील फडणवीस सरकारने घातला पण महावितरणचे कर्मचारी व जनतेच्या विरोधामुळे तूर्तास वीज वितरण अदानीकडे जाऊ शकले नाही. दुबईच्या कंपनीने धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी जास्त पैशांची बोली लावून करार केला असतानाही तो करार रद्द करुन मोदी सरकारच्या हट्टापायी धारावीचा प्रकल्प अदानी कंपनीला कमी पैशात देण्यात आला. अदानीचा गैरकारभार पाहता धारावीतील लाखो गरिब लोकांची घरे व छोट्या उद्योगांसमोर संकट उभे राहिले आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
तुमच्या उपयोगाच्या महत्वाच्या बातमीसाठी वाचा khabarbat.com