इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या जीवनावर रावळपिंडी एक्सप्रेस नावाचा चित्रपट येत असल्याची घोषणा करण्यात आली होती. आता शोएब अख्तरने या बायोपिकमधून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. अख्तर यांनी चित्रपट निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
शोएब अख्तरने सोशल मीडियावर ट्विटद्वारे चाहत्यांना याची माहिती दिली. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, अत्यंत दु:खाने, मी तुम्हा सर्वांना कळवू इच्छितो की, अनेक महिन्यांच्या विचारानंतर मी ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ चित्रपट आणि त्याच्या निर्मात्यांसोबत माझ्या व्यवस्थापन आणि कायदेशीर टीमद्वारे करार रद्द केला आहे.
Important announcement. pic.twitter.com/P7zTnTK1C0
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) January 21, 2023
या चित्रपटात शोएब अख्तरची भूमिका साकारणारा अभिनेता उमेर जसवालनेही चित्रपट सोडला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला उमीरने जाहीर केले होते की चित्रपट निर्मात्यांसोबतच्या वादामुळे त्याने रावळपिंडी एक्सप्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, शोएब अख्तरने निर्मात्यांना इशारा दिला आहे, त्याने लिहिले की, जर चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट पुढे नेला, किंवा माझ्या नावावर किंवा माझ्याशी संबंधित कोणतीही कथा बनवली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.