विश्लेषण / श्रीपाद सबनीस
महापालिकेच्या निवडणुकीचे ढोल-ताशे आताशा वाजू लागले आहेत. त्यात खरे रंग अजून भरायचे आहेत. तोपर्यंत वावड्यांच्या तुताऱ्या फुंकायला सुरुवात झाली आहे, हे नक्की. सध्या मराठवाड्याचे केंद्रबिंदू म्हणून लातूरकडे पाहिले जात आहे. त्यात राजकारण हे क्षेत्र अपवाद कसे ठरेल?
भाजप युवा मोर्चाचा मेळावा चर्चेत रहावा या अनुषंगाने तसा काही खमक्या विषय समोर नव्हता. मग शिळ्या कढीला ऊत आणण्याची शक्कल लढवली गेली. मात्र ही कढी या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या काही पचनी पडली नाही. म्हणूनच कि काय, ‘देशमुख काही येत नाही, आम्ही काही घेत नाही’ या शब्दांत संभाजी पाटील निलंगेकरांवर घुमजाव करण्याची नामुष्की ओढवली.
दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याची तुतारी पुन्हा एकदा भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी फुंकली. आपल्या या वक्तव्यामुळे लातुरच्या राजकारणात खळबळ उडेल अशी अपेक्षा त्यांना असावी. मात्र लातूर जिल्ह्याचे राजकारण ज्यांनी जवळून अनुभवले किंवा इथल्या राजकीय प्रवाहात जे वावरले त्या साऱ्या लोकांना ‘प्रिन्स’च्या करिश्माई ताकदीची पुरेशी कल्पना आहे.
भाजपने जणू काँग्रेसजनांसाठी पायघड्याच अंथरल्या आहेत, असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. महाराष्ट्राला धक्का बसेल असे प्रवेश होतील, सगळे जण भाजपामध्ये येतील, यात बरीच मोठमोठी नावं आहेत, फक्त वेळ आणि ठिकाण ठरवायचं आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. कदाचित भाजपातील सुप्त खदखद त्यांच्या कानी नसावी, किंवा ती जागीच ठेचण्यासाठी ‘इन्कमर्स’चा बागुलबुवा उभा केला असावा. ही दुसरी शक्यता अधिक असू शकते.
निलंगेकर काय म्हणाले…
‘आपला राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा साबुत राखण्यासाठी आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर आहेत. जरी अमित देशमुख भाजपमध्ये येण्यास इच्छूक असले तरी मात्र आम्ही त्यांना पक्षामध्ये घेणार नाही. त्यांचा भाजप प्रवेश माझ्या युवा कार्यकर्त्यांना आवडणार नाही, कारण अमित देशमुख हे लातूरचे ‘प्रिन्स’ राजकुमार आहेत. सतत सत्तेत राहावे, अशी त्यांची इच्छा आहे. असे असले तरी जनतेचे प्रश्न कधीच देशमुख यांनी मांडले नाहीत, अशी टिका आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजप युवा मोर्चाच्या मेळाव्यात केली. लातुरच्या राजकारणात देशमुख घराण्याचं चांगले वर्चस्व आहे. जिल्ह्यात देशमुख घराण्याला मोठा जनाधार आहे. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्यास काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.
‘प्रिन्स’ भाजपात चाकरी करेल?
संभाजी पाटील निलंगेकरांना कार्यकर्त्यांना चेतवणे भाग होते, ते बोलले. लातुरात तुल्यबळ असे एकच देशमुख घराणे आहे. ज्यांच्याविषयी बोलून आपली उंची वाढवता येऊ शकते. आणि एक मात्र खरे कि, लातूरचा ‘प्रिन्स’ हा राजकुमारच आहे, तो चाकरी कसा करेल? हे देखील त्यांना चांगलेच माहीत आहे.
भाजपला भरोसा हाय का?
महापालिका, विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय हवा तापविण्यापूर्वी किडूक-मिडूक चाचपून पाहण्याची गरज असते. संभाजी पाटलांनी ही चाचपणी केली का? भाजपला ‘इनकमिंग’ वाढण्याचा, निवडणुकीनंतर त्यांचेच सरकार येण्याचा भरोसा आता आहे का? आणि तशी अपेक्षा असली तरी फारसे काही हाती लागेल असेही नाही. कारण, एकीकडे भाजपचा आत्मविश्वास ढेपाळत चालला असल्याचे दिसत असताना कोण कशाला बुडत्या जहाजाची सफर करायला जाईल? आगामी निवडणुकीनंतर असंतुष्ट भाजपाईंचे ‘आउटगोइंग’ वाढण्याची शक्यता अधिक आहे. तेव्हा ‘मविआ’ सत्तारूढ होण्याची शक्यता बळावली, तर संभाजी पाटील कोणाच्या बाजूने असतील?
तूर्त तरी… ‘खरं काय खोटं काय, कोणाला उमजत नाय; राजकारण बरीक सारा शक्यतांचा खेळ हाय’ इतकेच !!